दिल्ली च्या धर्तीवर राज्यातील 497 शासकीय आश्रमशाळेत शिक्षकांसाठी “माझी शाळा माझा स्वाभिमान ” शैक्षणिक पॅटर्न

शिक्षणातील नवीन बदल शिक्षकांनी आत्मसात करावेत….
अकोले-प्रथमा एज्युकेशन संस्था नवी दिल्ली यांच्यामार्फत आदिवासी विकास विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या महाराष्ट्रातील शासकीय आश्रम शाळेतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी दिल्ली राज्यशासनाच्या धर्तीवरील “माझी शाळा माझा स्वाभिमान ” हा शैक्षणिक पॅटर्न राज्यातील 497 शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांसाठी सन 2024-25 ते 2026-2027 या त्रैवार्षिक शैक्षणिक सत्रामध्ये राबवण्यात येत असून या शैक्षणिक वर्षांतील अभ्यासक्रम प्रशिक्षण दि.19 व 20 जुलै 2025 रोजी अहिल्यानगर जिल्ह्य़ातील 21 शासकीय आश्रम शाळेतील शिक्षकांसाठी प्रशिक्षण सावरचोळ ता.संगमनेर येथील शासकीय आश्रम शाळेत आयोजन करण्यात आले आहे.
आज दि.19 जुलै 2025 रोजी प्रशिक्षणाचे उदघाटन राजुर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे आदिवासी विकास निरीक्षक श्री.प्रमोद राऊत यांच्या प्रमुख उपस्थित व जेष्ठ मुख्याध्यापक श्री.बाळासाहेब शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
श्री. शिरसाठ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वरीलप्रमाणे उदगार काढले.श्री.शिरसाठ आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासात शिक्षकाची भुमिका महत्त्वाची व प्रेरणादायी ठरली आहे. मुलांच्या विचारशक्तीला चालना देणे,कुतुहल वाढवणे, सामाजिक, भावनिक शिक्षणाला आधार देणे,सर्व समावेशक शिक्षणाचे वातावरण निर्माण करणे या प्रत्येक बाबतीत शिक्षकाचे कार्य केवळ धडे शिकविण्यापुरते मर्यादित नसून उद्याच्या व्यक्तीमत्वाचा पाया घालणे व शिक्षणाच्या माध्यमातून संवेदनशील, जबाबदार आणि विचारशील नागरीक बनतील यासाठी प्रयत्न करणे हा आहे.आताच्या काळात अनेक माध्यमे शिक्षणासाठी उपलब्ध असुन त्याद्वारे मुलांच्या शिक्षणाची कवाडे खुली करावेत असे आवाहन श्री.शिरसाठ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शेवटी केले.
या प्रसंगी राजुर प्रकल्पांतर्गत येणाऱ्या विविध शाळांचे मुख्याध्यापक या दोन दिवशीय प्रशिक्षणासाठी उपस्थित आहेत. उदघाटनपर कार्यक्रमात सावरचोळ आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.नवनाथ गायकवाड यांनी उपस्थित पाहुण्यांचे व प्रशिक्षणार्थींचे स्वागत केले तर प्रथमा फौडेशनचे शिक्षकमित्र यांनी प्रशिक्षणाचा उद्देश विशद केला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पल्लवी दातिर यांनी केले तर आभार श्री.दिपक कचरे यांनी मानले दोन दिवसीय प्रशिक्षणात एकूण 85 शिक्षक सहभागी असुन आश्रम शाळा गुणवत्ता विकास दृष्टिकोनातून प्रथमा शैक्षणिक पॅटर्नचा शिक्षकांना विद्यार्थ्यातील जिज्ञासा जागृत करण्यासाठी उपयोग होत आहे.