इतर
ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा दोन पूर्णत्वाकडे;
ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा दोन पूर्णत्वाकडे;
निधी कमी पडू देणार नाही – आमदार मोनिका राजळे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगांव तालुक्यातील पूर्व भागातील सुमारे २० गावातील शेतीसाठी महत्वपूर्ण असणारी ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा २ योजनेचे काम प्रगती पथावर असून ऑक्टोबर २०२२ अखेर विद्युत कामे व जोडणी पूर्ण होवून मुख्य वितरण कुंडापर्यंत पाणी पोहच होवू शकेल तसेच प्रत्यक्ष वितरण कुंडापासून आऊटलेट पर्यंत (PDN) पाईप वितरण व्यवस्थेची कामे डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन अहमदनगर मध्यम प्रकल्प विभागा मार्फत पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. या कामासाठी सन २०२२-२३ चे अंदाजपत्रकात १३ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ही योजना डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करुन शेतकर्यांना प्रत्यक्ष लाभ देण्याच्या दृष्टीने कामाचे नियोजन करण्यात आल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जायकवाडी प्रकल्पातून ताजनापुर उपसा सिंचन योजना टप्पा-२ ता. शेवगांव, या योजनेद्वारे शेवगांव तालुक्यातील २० गावातील ६९६० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळण्यासाठी मुळ ३९५.४८ कोटी अंदाजपत्रकाचे काम जून २०११ मध्ये सुरु करण्यात आले
या योजनेचा लाभ शेवगांव तालुक्यातील खानापूर, आंतरवाली, घोटण, बाभुळगांव, राक्षी, कुरुडगांव, रावतळे, मळेगांव, गदेवाडी, ठाकूर निमगांव, सोनेसांगवी, कोळगांव, हसनापुर, वरखेड, चापडगांव, दहिगांवशे, प्रभुवाडगांव, मंगरुळ खु., मंगरुळ बु., आंतरवाली बु., या गावांना होणार आहे. या योजनेवर मार्च २०२२ अखेर एकूण ९७.७४ कोटी इतका खर्च झाला असून, यामध्ये पोहोच कालवा, मुख्य पंपगृह, पोहोच रस्ते कामे पूर्ण होत आली आहेत. ऊर्ध्वगामी नलिका १,२,३ च्या १९.१४ कि.मी. पैकी १९ कि.मी. चे काम पूर्ण झाले आहेत. शेवगांव सबस्टेशन ते खानापुर या विद्युत लाईनचे काम पूर्ण होत आले असून ऑक्टोबर २०२२ अखेर प्रत्यक्ष विज जोडणीचे काम पूर्ण होईल. विज जोडणी होताच ब्लॉक १,२,३ याद्वारे एकूण २१६० अश्वशक्ती च्या इलेक्ट्रिक मोटारद्वारे मुख्य वितरण कुंडापर्यंत पाणी पोहच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापुढील महत्वाच्या टप्प्यात पाईप वितरण व्यवस्था कामासाठी जून २०२१ मध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण करुन १०८.७५ कोटीची निविदा मंजूर होवून मे. डब्लयू पी.आय.एल. कोलकत्ता यांना कार्यारंभ आदेश जून २०२१ मध्ये दिले आहेत. या निविदा कामाअंतर्गत पाईप वितरण व्यवस्थेचे सर्वेक्षण - CCA (६६०५ हेक्टर करीता) पूर्ण झाले असून प्रत्यक्ष वितरण कुंडापासून आऊटलेट पर्यंत व शेतकर्यांच्या शेतापर्यंत PDN ( पाईप वितरण व्यवस्था) नेण्याचे काम प्रत्यक्षात सुरु होवून, डिसेंबर २०२३ पर्यंत स्वीचयार्डची स्थापत्य कामे पूर्ण करुन पाईप वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण होणार आहे. ऑक्टोबर २०२२ पर्यंत वितरण कुंडापर्यंत पाणी पोहच करुन डिसेंबर २०२३ पर्यंत प्रत्यक्ष शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी नियोजन केलेले आहे. या वितरण व्यवस्थेचे सोईस्तव लाभ क्षेत्राचे ३ विभाग करण्यात आले असून सर्वप्रथम लांबच्या अंतरावर प्रथम पाणी नेण्याचे नियोजन केलेले आहे.
या ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा २, योजनेचे कामे निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी उर्वरीत निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा करुन या कामांना निधी कमी पडू देणार नसल्याचे यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.