अनाथांची माय सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड!

पुणे : महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचे निधन झाले त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
मंगळवारी दि ४जानेवारी रोजी त्यांचे पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. महिना भरापूर्वी त्यांचे हर्निया चे ऑपरेशन झाले होते, त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते, आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गॅलक्झी केअर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, “सिंधुताई यांना छातीचा हार्निया झाला होता. त्याच्यावर दीड महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होतो. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.”


सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. माई या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सिंधूताईचं जीवन अत्यंत खडतर होतं. बालविवाह झालेल्या सपकाळ यांनी नवऱ्याने केलेल्या अत्याचारांनंतर घर सोडलं. त्यानंतर अनाथांचा सांभाळ करणं हे त्यांनी आयुष्याचं ध्येय बनवलं.

हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत त्यांची माय बनलेल्या सिंधुताई यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले

सिंधुताई सपकाळ यांनी 1994 साली पुण्यातील पुरंदर तालुक्यात अनाथ मुलांसाठी ‘ममता बाल सदन’ नावाची संस्था स्थापन केली. अनाथ मुलांसाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रासह देशभरात त्या ‘अनाथांची माय’ म्हणून परिचित झाल्या.
सिंधुताई सपकाळ या गेली 40 वर्षे सामाजिक कार्य करत होत्या. त्यांना आजवर 750 हून अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. अनाथ मुलांना आईसारखी माया देणाऱ्या सिंधुताई नेहमी अभिमानाने सांगायच्या की, मी हजारहून अधिक मुलांची आई आहे. सामाजिक जीवनात त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये भेटी दिल्या विविध कार्यक्रमात सहभागी झाल्या त्यांच्या या आठवणीं आज ठिकाणी आठवणी जागवल्या जात आहे
