इतर
दिव्यांग व महिला मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम – उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जितेंद्र पाटील

अहमदनगर /प्रतिनिधी.
जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे जिल्ह्यात सर्वत्र दिव्यांग आणि महिला मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.
25 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सुध्दा मतदार नोंदणीसाठी जनजागृती करावी. तसेच येणा-या राष्ट्रीय मतदान दिनाच्या दिवशी तालुका आणि गाव पातळीवर राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन विविध संस्था संघटनांनी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले आहे. जिल्हाधिका-यांच्या वतीने उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
उपजिल्हाधिकारी निवडणूक श्री. पाटील म्हणाले, नुकत्याच अद्ययावत मतदार याद्या प्रकाशित करण्यात आल्या असून यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात एकूण 35 लाख 57 हजार 266 मतदार असून यामध्ये 18 लाख 50 हजार 954 पुरुष मतदार तर 17 लाख 06 हजार 127 स्त्री मतदार आणि 185 तृतीयपंथी मतदार आहेत. नव्याने मतदार नोंदणीसाठी, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनातर्फे मतदार जनजागृती काम सुरु आहे. येत्या 25 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय मतदान दिवसानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमाचे आयोजन औरंगाबाद येथे करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली. त्यानिमित्त 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय मतदार दिवस गेल्या 12 वर्षापासून राज्यात साजरा होत आहे.
यंदा साजरा करण्यात येणा-या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे शासनाचे निर्देश असुन त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. मतदारांच्या नोंदणीचे प्रमाण वाढावे हा या कार्यक्रमाचा उद्देश असून सध्या 100 पुरूष मतदारांमागे स्त्रीयांचे प्रमाण हे 922 इतके आहे. मा. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार येत्या काळात ऑनलाईन मतदार नोंदणीवर जास्त भर दिला जाणार आहे. मतदार यादी निर्दोष व त्रुटीविरहीत करण्यासाठीचे काम निवडणूक कार्यालयातर्फे करण्यात येत असून मयत झालेले व स्थलांतरित झालेले मतदारांची मतदार यादीतुन वगळणी करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी यावेळी दिली. *****
