इतर

अहमदनगर येथे होणाऱ्या १५व्या शब्दगंध साहित्य संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – सुनील गोसावी


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने ७ व ८ ऑक्टोंबर रोजी अहमदनगर येथे ज्येष्ठ साहित्यिक, माजी सनदी अधिकारी डॉ. पुरूषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात मान्यवरासह नवोदित साहित्यिकांना सामावून घेण्यात येणार असल्याने साहित्यिक व साहित्य रसिकांनी या संमेलनास उपस्थित रहावे असे आवाहन शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या औरंगाबाद जिल्ह्यातील सभासद व साहित्यिकांच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यालयांत बैठकीत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे खजिनदार, लोककला अभ्यासक भगवान राऊत, प्रा.डॉ. गणी पटेल, डॉ.शेषराव पठाडे, डॉ संजय पाईकराव, तानाजी शेटे, सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी गोविंद पायघन,संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडूळे,कार्याध्यक्ष प्रा डॉ.अशोक कानडे, ठाणे जिल्हा समन्वयक भानुदास वाघमारे, नाशिक चे समन्वयक विलास कातकडे इ मान्यवर उपस्थित होते.
वीस वर्षांपूर्वी नवोदित लेखकांसाठी सुरू झालेली ही साहित्यिक चळवळ आता सर्वदूर पोहचली असून या चळवळीच्या माध्यमातून अनेकांना लिहिते करण्याचे काम झालेले आहे. या चळवळीतील अनेक साहित्यिकांना वेगवेगळ्या विचार पिठावर संधी मिळत असून अनेकांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.शब्दगंधने आतापर्यंत 250 पुस्तकांचे प्रकाशन केलेले असून त्यातील काही पुस्तके विद्यापीठस्तरावर अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून तर काही शासनाच्या ग्रंथ खरेदीत खरेदी झालेली आहेत.
राज्यातील सर्व सभासदांना विचार मंथन करता यावे,एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन सुरू झालेले असून यापूर्वीचे १४ संमेलने यशस्वीपणे पार पडलेली आहेत. बिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवली असून ज्येष्ठ सनदी अधिकारी, साहित्यिक, कवी, गीतकार डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या निवडीने यावर्षी संमेलन एका विशिष्ट उंचीवर पोहोचणार आहे. या संमेलनाचे पूर्वाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी प्रा. फ मु.शिंदे, इंद्रजीत भालेराव, चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर,ज्येष्ठ विचारवंत डॉ.कुमार सप्तर्षी, आमदार कविवर्य लहू कानडे, प्रशांत मोरे, प्रकाश घोडके, भारत सासणे यांच्यासारख्या दिग्गजांनी संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्य सेवा केलेली आहे.
या संमेलनात उद्घाटन,लोककला, लोकजागर साहित्य यात्रा, ग्रंथ प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद,चर्चासत्र,कथाकथन, दोन काव्यसंमेलने,वाड्मय पुरस्कार वितरण, साहित्य स्पर्धा पारितोषिक वितरण व समारोप होणार असून एका सेलिब्रिटीची मुलाखतही होणार आहे, अशी माहिती भगवान राऊत यांनी दिली.अहमदनगर शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असुन या संमेलनाची पूर्वतयारी प्रगतीपथावर आहे. शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्यासह संयोजन समितीचे पदाधिकारी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button