-संत भगवानबाबा- अध्यात्मिक ऊर्जा व प्रेरणेच विदयापीठ

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधि
महाराष्ट्रातील अनेक संतांनी संप्रदायातील धुरीणांनी ” आधी संसार करावा नेटका “असे म्हणत प्रपंचाची आणि परमार्थाची सांगड घालून भरकटत चाललेल्या समाजाला मूलमंत्र घालून दिला आहे .
मुळातच भारतीय संस्कृती ही भोगवादी नसून त्याग वादी आहे. ब्रह्मचर्य हेच सुखी जीवनाचे सार आहे असे जीवनसूत्र सर्वच संतांनी मांडलेला दिसतो अनिष्ट परंपरा, रूढी, यांच्यावर कडाडून हल्ला करताना समाजाला नवी दिशा देतांना सत्कर्माला नैतिकतेचे बळ देऊन संतांनी समाजाला प्रयत्नवाद आणि नितिमत्ता शिकवली .भजन, किर्तन, प्रवचनच्या माध्यमातून नामस्मरण आणि भक्तीयोग जनमानसाच्या मनावर बिंबवण्याचे कार्य या साधुसंतांनी नेहमीच केला आहे.
सामाजिक शुद्धीकरण करण्याची जणू काही त्यांनी प्रतिज्ञा घेतली होती .संपूर्ण विश्वाचे कल्याण करणे हाच खरा मानवतावादी धर्म आहे हे उदात्त विचार संत कार्याच्या प्रत्यक्ष कृतीतून दिसून येत आहे .वेगवेगळ्या संतांच्या या मांदियाळीत बीड जिल्ह्यात सावरगाव तालुका पाटोदा या गावी एक असा पुत्र जन्माला येतो जो आपले अवघे जीवन आपल्या अशिक्षित आणि वाट भरकटलेल्या समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य हाती घेतो आणि आत्म त्याग आणि नैतिकतेचे अधिष्ठान लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे आपणा सर्वांचे भगवानबाबा . लहानपणापासूनच त्यांना नारायण गडाची दिंडी कार्तिकी वारी पाहण्याचे योग आला. दिंडीतील टाळमृदंग, लोकांचा आवाज, भगव्या पताका वारकऱ्यांचा संथपाऊल टाकत चालणे या सर्व गोष्टी पाहिल्या नंतर सर्व विसरून दिंडीत सामील होऊ लागले. आपल्या पंढरपुर वारी नंतर त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारची विक्ती जाणू लागली. आपला जन्म कशासाठी झाला आहे?? आपण आता काय करायला हवे ?आपल्या जगण्याचे प्रयोजन काय आहे? अशा एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये तांडव घालत होते आणि या सर्व प्रश्नांचे उत्तर फक्त आणि फक्त अध्यात्मात आहे याची जाणीव त्यांना झाली.. आणि पंढरपूरहून परत आल्यानंतर घरी न जाता ते थेट मारुती मंदिरात थांबले. मंदिरामध्ये स्थितप्रज्ञ सारखे शांत बसून राहिले. आणि त्यांच्या गळ्यातील तुळशीमाळ दाखवत सर्व गावकऱ्यांना दृढनिश्चयी स्वरांमध्ये त्यांनी आता वारकरी झालो आहे .सर्वांनी मांस, मच्छीमार खाणे बंद करावे आणि गळ्यामध्ये तुळशीमाळा घालावे अशी अट सर्वांना घातली आणि त्यांच्या सत्कर्मवृत्तीमुळे सगळ्यांच्याच मनात बदल होऊन हळूहळू लोकांनी गळ्यात माळा घातल्या. संपूर्ण सावरगाव ची वाटचाल परमार्थाकडे आणि परमार्थिक आचरणाकडेसुरू होत चालली .
जगाच्या कल्याणासाठी मला गुरुमंत्र द्या अशी विनवणी लहानपणी त्यांनी माणिक बाबांचे पाय धरून त्यांना केली. परंतु त्यावेळी माणिकबाबांनी त्यांची परीक्षा घेण्यायाचे ठरवले आणि त्यांना समोर उंच कड्यावरून खाली उडी मारण्याची आज्ञा केली .भगवानबाबांनी आदेश शिरसवंदय मानून उडी मारली. हे पाहून माणिकबाबां,च्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले.
भगवानबाबांनी जेव्हा समाज कार्य हाती घेतले तेव्हा समाजाची खूप वाताहत झालेली होती. निजामांची जुलमी शोषण करणारी राजवट ,ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी टाकला जाणार दबाव या एक ना अनेक समस्याशी समाज झगडत होता. भोळ्याभाबड्या गरीब अडाणी समाजाला देशोधडीला लावले जात होते. उत्पन्न कमी, खर्च जास्त, अशी परवड समाजाची होती. सावकारीचा फास आवळत चाललेला होता अज्ञानपणा विषमता, संकुचित वृत्ती, हेवेदावे या सर्व गोष्टीमुळेसमाज पोखरत चालला होता अशा या अत्यंत कठीण परिस्थिती मध्ये भगवानबाबांनी समाजाला उपदेश केला . “स्वतः स्वतःचे उद्धारकर्ते बना दुसऱ्यावर अवलंबून राहू नका, स्वावलंबी बना कर्ज काढू नका,,, अशा प्रकारची समाधी सुधारणा करण्याची त्यांची मोहीम चालू होती .शिक्षणाचे महत्त्व ओळखून शिक्षणासाठी वेळ प्रसंगी जमिनी विका,परंतु मुलांना शिकवा “अशी आर्त हाक त्यांनी आपल्या समाजबांधवांना घातली होती. आपण सर्व ईश्वराची लेकरं आहोत आणि आपण आपले कर्तव्य ,ईश्वराचे कर्तव्य समजून पूर्ण करावेत असं त्यांना वाटत असे.किर्तन ,प्रबोधन, किर्तन आणि प्रवचनं करून त्यांचे प्रबोधन करणे अखंड चालू होते. त्यांच्या बोलण्यात सत्यता होती, आवाजाला ईश्वराची देणगी लाभलेली होती, त्यांचे बोल मनाला भेदून जाणारे होते, बोलायला लागले की श्रोते मंत्रमुग्ध होऊन जायचे, बाबांचे किर्तन ऐकल्यानंतर लोकांमध्ये आमूलाग्र बदल होऊ लागले, लोकांनी स्वतःहून वाईट प्रवृत्ती पासून दूर जाण्याचे निर्णय घेतले, हळूहळू समाजात बदल आणि प्रगती होत चालली .आज ही समाजाची प्रगती आणि विकास दिसतोय या सर्वांच्या मागे भगवान बाबांची अथक प्रयत्न साधना आणि त्याग हेच दिसून येते .
बाबा परोपकारी होते आणि त्यांनी परोपकाच्या मार्गाने पुढे गेल्यास आपल्या आयुष्यात सफल होऊ शकते या गोष्टीवर त्यांचा विश्वास होता आणि त्यांनी लोकांना देखील याच तत्त्वावर आपला जीवन मार्गक्रमण करण्याचा उपदेश केला होता भगवान गड आणि भोवतालचा परिसर हा डोंगराळ, अतिदुर्गम असा परिसर अतिमागास अशिक्षित अशा या समाजाला ्यांनी खर्या अर्थाने परिस स्पर्श केलेला होता आणि म्हणूनच आज समाजातील व्यक्ती देशातील अनेक उच्च पदावर कार्यरत आहेत .सर्वच क्षेत्रांमध्ये घसघशीत यश संपादन केले ते शिक्षणाच्या जीवावर आणि ते शिक्षण देण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी समाजबांधवांना दिशा दिली होती. भगवान बाबा आजच्या युगातील आधुनिक शिल्पकार आहेत अशा या भगवान बाबांच्या चरणी लीन होऊन नतमस्तक होऊन यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र आदरांजली व्यक्त करतो.
शब्दांकन.
आरीफ बेग
जि.प. प्राथ. शाळा नांदूरनिंबादैत्य ता. पाथर्डी
मो. ९४२००३२५७७ /