कृषीग्रामीणप.महाराष्ट्र
नाशिक जिल्ह्यातील तीन गावे टँकर मुक्तीच्या दिशेने!

सिन्नर च्या ॲटोकाँप प्रा. लि. कंपनी
आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक च्या मदतीने गाव टँकर मुक्त होणार
नाशिक प्रतिनिधी
एस एन एफ चा तांत्रिक समन्वयातून आणि सिन्नरच्या ॲटोकाँप प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक च्या मदतीने नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील तीन आदिवासी गाव टँकर मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे
चांगल्या कामाला सुरुवात करायचा अवकाश कि शेकडो हात सोबत येतात असा अनुभव नेहमीच येतो. तसंच यावर्षीही सोशल नेटवर्किंग फोरमच्या टँकरमुक्ती साठीच्या प्रयत्नांना मोठं यश मिळते आहे. या उन्हाळ्यात एसएनएफने हाती घेतलेल्या १० गावांपैकी ३ गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याकामी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पेठ तालुक्यातील डोंगरशेत, चिरेपाडा आणि मोहाचापाडा ही तिन गावं गेली अनेक वर्षे पाण्याच्या समस्येला तोंड देत आहेत. डिसेंबर संपला कि गावकऱ्यांचे प्रचंड हाल होतात आणि त्यांना दऱ्या खोऱ्यातून पाणी शोधत फिरावे लागते. या गावांची माहिती मिळताच काही महिन्यांपूर्वी एसएनएफच्या टिमने गावची पहाणी करून एक पर्याय शोधला आणि तसा प्रस्ताव तयार केला. त्यावर तातडीने निर्णय घेत वरील तीन गावांसाठी सिन्नरच्या ॲटोकाँप प्रा. लि. कंपनी आणि रोटरी क्लब ऑफ नाशिकने मदतीचा हात दिला या आर्थिक योगदानाच्या बळावर मोठ्या उत्साहात ग्रामस्थांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
गावापासून चार किलोमीटरवरील दमण नदीच्या काठावर गावकऱ्यांनी श्रमदानातून विहिर खोदण्यास प्रारंभ केला.
गावकऱ्यांचे श्रमदान, देणगीदारांचे आर्थिक योगदान आणि एसएनएफचा तांत्रिक समन्वय या माध्यमातून लवकरच हे काम यशस्वी होईल.