स्वातंत्र्याचा उजेड भटक्या-विमुक्तांच्या पालापर्यंत अद्याप पोहचलाच नाही ! —किसन चव्हाण

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
‘अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गोष्टींची व्यवस्था जर भटक्या-विमुक्तांसाठी इथल्या शासन व्यवस्थेने केली असती, तर गुन्हेगारीचा शिक्का त्यांच्यावर लागलाच नसता. पोटासाठी आज आपल्या देशात चोरी करावी लागते. स्वातंत्र्याचा उजेड भटक्या-विमुक्तांच्या पालापर्यंत अद्याप पोहोचलाच नाही’ असे प्रतिपादन सुप्रसिध्द लेखक व बहुजन चळवळीतील लढवय्ये कृतिशिल कार्यकर्ते ‘आंदकोळ’ कार श्री किसन चव्हाण यांनी केले.
वालचंद कॉलेज ऑफ आर्टस् ॲण्ड सायन्सच्यावतीने मराठी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या दोहोंचे औचित्य साधून ‘मी व माझी साहित्यकृती’ या विषयावर त्यांचे ऑनलाईन माध्यमातून विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष कोटी हे उपस्थित होते.
आपल्या भाषणात पुढे बोलताना किसन चव्हाण म्हणाले की, “आमच्या पालात आई-वडीलांनी ज्ञानाचा दिवा लावला म्हणून मी शिकलो. शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे. आजवरच्या मराठी साहित्यातील आत्मकथनांनी केवळ भोगवटा मांडला, माझं ‘आंदकोळ’ हे आत्मकथन मात्र लढायला आणि जगायला शिकवतं. शिकलेल्या तरुणांनी आज डीकास्ट होणे गरजेचे आहे. आज आपण जातींची बेटं तयार केली आहेत. आज तरुणांनी अन्याय-अत्याचाराच्या, शोषणाच्याविरुध्द लढलं पाहिजे !
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.संतोष कोटी बोलताना म्हणाले की, “किसन चव्हाण यांच्या लेखणीला सत्य, समाजाविषयीची तळमळ, नैतिकतेची चाड तसेच कार्यकर्ता म्हणून प्रत्यक्ष चळवळीत काम केल्यामुळे एक विलक्षण धार प्राप्त झाल्याचे ‘आंदकोळ’ मधून अनुभवास येते. आजच्या तरुणांनी ‘आंदकोळ’ व किसन चव्हाण यांच्याकडून समाजाच्या उत्कर्षासाठी प्रेरणा घेतली पाहिजे”.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री हनुमंत मते यांनी तर प्रमुख अतिथींचा परिचय श्री नानासाहेब गव्हाणे यांनी करुन दिला. तसेच सूत्रसंचालन प्रा.सौ.पद्मावती पाटील यांनी तर आभार प्रदर्शन श्री राजू नवले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.आर.डी.गोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक व इतर महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.