शेकडो लग्नाळू तरुणींची फसवणूक, दोन भामटे गजाआड!

पुणे/प्रतिनिधी
केंद्र शासनामध्ये मोठ्या पदावर सेवेत आहे असे सांगून लग्न जुळवणीच्या संकेतस्थळावरून देशातील अनेक लग्नाळू तरुणींना कोट्यवधी रुपयांना गंडा घालत फसवणूक झाली आहे शेकडो तरुणींची फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना पुण्यात वाकड
पोलिसांनी बंगळुरू येथून अटक केली आहे
. आरोपींनी पुणे, बंगळुरू व गुरगाव येथील २५५ तरुणींना लग्नाच्या आमिषाने गंडा घालत एकूण सव्वा ते दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती परिमंडळ दोनचे पोलिस उपआयुक्त आनंद भोईट यांनी दिली आहे.
याप्रकरणी निशांत रमेशचंद नंदवाना (३३, रा. राजस्थान)
आणि विशाल हर्षद शर्मा (३३, रा.कोटा, राजस्थान, सध्या दोघे रा. बंगळुरू) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वाकड परीसरातील दोन तरुणींनी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांना भेटून त्यांची लग्न जुळवणी संकेतस्थळावरून दोघांनी ओळख करून शारीरिक शोषण करत आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार केली होती. तरुणींच्या तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर भामट्यांना पोलिसांनी अटक केली. आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी आरोपी निशांत नंदवानाच्या ताब्यातून सहा महागडे मोबाइल, अॅपलचे मॅकबुक, वेगवेगळ्या नावांची बनावट ओळखपत्रे, बनावट पॅनकार्ड, बनावट आधार कार्ड, महागडी घड्याळे, कॅमेरे, पावत्या, गुन्ह्यातील साडेनऊ लाख रुपये व एका स्कोडा कार जप्त करण्यात आली.
आरोपी विशाल शर्माकडून पोलिसांनी सात महागडे मोबाइल, लॅपटॉप, बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड, ओळखपत्रे, साडेपाच लाख रुपये व एक कंपास जीप कार जप्त केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता २८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बंगळुरूच्या १४२, पुण्याच्या ९१ मुलींची फसवणूक
दोन्ही आरोपींकडे केलेल्या प्राथमिक तपासात त्यांनी पुण्यातील ९१ मुली, बंगळुरूच्या १४२ मुली, गुरगावमधील २२ मुलींकडून लाखो रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. बोगस नावाने आरोपींनी देशभरात अनेक मुलींचे लैंगिक शोषण केले असून त्यांचा विश्वासघात केला आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात बंगळुरू, गुरगाव, पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले
आहेत. अशा प्रकारे बळी पडलेल्या पीडित मुलींनी वाकड पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.