——————————————–
अकोले :प्रतिनिधी
' सहज - सरळ भाषाशैलीत संवादी लेखन हे डॉ . अनिल अवचटांचे वेगळे वैशिष्ट्य होते आणि हेच वैशिष्ट्य वाचकांना - अभ्यासक , चाहत्यांना सदैव भावले . त्यांच्या पत्रकारितेला संवेदनशीलता होती , म्हणूनच वार्तांकन शैलीची यथोचित ढब अवचट यांच्या लेखनीत उतरली होती . ' अशी प्रतिक्रिया डॉ . सुनील शिंदे यांनी विख्यात लेखक डॉ . अनिल अवचट यांच्या निधनानंतर व्यक्त केली आहे .
डॉ . अवचट यांची आपुलकी तसेच माणुसकी संदर्भात आठवण नोंदवताना डॉ . शिंदे म्हणाले , ‘ माणूस म्हणून ते फारच उंचीचे होते . जेंव्हा जेंव्हा विभागीय अथवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांची भेट व्हायची तेंव्हा तेंव्हा हमखास ओळखीचं हसू आणि हात वर करुन दखल घेण्याचं त्यांचं आपुलकीचं वागणं स्मरणात आहे ! खांद्यावरील शबनम मधून नवीन काढलेली चित्रं तर ते आवर्जून – आस्थेनं दाखवायचे … ‘ हे नवीन अलीकडील चित्र ‘ असं अत्यंत हळुवार आवाजातलं त्यांचं बोलणं असायचं . ‘ माणसं ‘ , ‘ संभ्रम ‘ , ‘ आप्त ‘ , ‘ वाघ्यामुरळी ‘ , ‘ पूर्णिया ‘ ही पुस्तकं अधिक भिडली . ‘ वाघ्यामुरळी ‘ वरील परीक्षण मी ‘ अस्मितादर्श ‘ नियतकालिकासह अन्य एकदोन वर्तमानपत्रात लिहिलं होतं ! ‘
' समर्पक , तर्कशुद्ध आणि ओघवते लेखन करणारे लेखक आणि संवेदनशील कार्यकर्ते - समाजसेवी म्हणून आदरणीय डॉ . अनिल अवचट संस्मरणीय राहतील ' अशी भावना डॉ . सुनील शिंदे यांनी आदरांजली वाहताना व्यक्त केली .
-----------------------------