मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना किती मदत दिली याचा उद्धव ठाकरेंनी हिशोब द्यावा
भाजपाचे नगर (उत्तर)जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांची मागणी
शिर्डी दि31 :मुख्यमंत्री असताना ज्यांनी ”मातोश्री” चा उंबरठा ओलांडला नाही ते उद्धव ठाकरे आता सत्ता गेल्यावर बांधावर जाण्याची नाटके करीत आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना संकटातील शेतकऱ्यांना किती मदत दिली याचा हिशोब द्यावा आणि मगच शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जावे , असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नगर(उत्तर)जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी हुशार आहे . तो उद्धव ठाकरेंच्या ढोंगीपणाला बळी पडणार नाही , असा विश्वासही राजेंद्र गोंदकर यांनी व्यक्त केला आहे.
राजेंद्र गोंदकर यांनी म्हटले आहे की , मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना घरकोंबडा मुख्यमंत्री अशी पदवी जनतेने दिली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना अनेकदा अतिवृष्टी , गारपीट या सारख्या संकटांना तोंड द्यावे लागले. मात्र त्यावेळी ठाकरेंनी एकदाही घराचा उंबरठा ओलांडून शेतकऱ्यांची भेट घेण्याचे सौजन्य दाखविले नव्हते.
शेतकऱ्यांना एक पैशाचीही मदत न करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना विदेशी दारूवरील कर ३०० टक्क्यांवरून १५० टक्क्यांवर आणला होता हे महाराष्ट्राची जनता विसरणार नाही. सत्तेवर येण्यापूर्वी याच उद्धव ठाकरेंनी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रु. मदत देण्याची मागणी केली होती. सत्तेवर आल्यानंतर ठाकरेंच्या सरकारने संकटातील शेतकऱ्यांना एक दमडीही दिली नाही. हेच उद्धव ठाकरे आता सत्ता गेल्यावर शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करीत आहेत. तुमच्या सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा हिशोब द्या आणि मगच शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जा , असेही राजेंद्र गोंदकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रु. देण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा कागदावरच राहिली. त्यावेळी उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांना आपल्या सरकारच्या तिजोरीतून काही द्यावेसे वाटले नाही. शिंदे – फडणवीस सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रु . जमा करणे सुरूही केले आहे, असेही राजेंद्र गोंदकर यांनी पत्रकात नमूद केले आहे.