ग्रामीण

साहित्यातून सकारात्मकता निर्माण करण्याची गरज – कुवळेकर

संगमनेर प्रतिनिधी
वर्तमान काळात नकारात्मकता वाढविणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. माध्यमांमधूनही प्राण घेणाऱ्या बातम्या मोठ्या ठरतात आणि प्राण वाचवणाऱ्या बातम्यांना स्थान मिळत नाही. अशावेळी लेखकांनी सकारात्मकता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी माहिती आयुक्त व ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांनी केले. ते चपराक प्रकाशनाच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर न्यायाधीश सुनील वेदपाठक, प्रकाशक घनश्याम पाटील, पत्रकार निसार शेख, संदीप वाकचौरे उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, मनोहर इनामदार, चंद्रलेखा बेलसरे उपस्थित होते.
कुवळेकर आपल्या भाषणात म्हणाले की, शिक्षणाशिवाय जगात परिवर्तन होऊ शकत नाही. मात्र शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकात असते तेवढे नाही. त्या पलीकडे देखील शिक्षण असते हे लक्षात घेण्याची गरज आहे. समाजामध्ये शहाणपण कमी होत आहे. शिकलेल्या माणसांमध्ये शहाणपण आहे असे वाटते पण त्यापेक्षा अडाणी माणसांमध्ये सुद्धा अधिक शहाणपण असल्याचे दिसते. अडाणी माणसं शहाणी आहेत. समाजामध्ये ऐकण्याची सवय वृद्धिंगत करण्याची गरज आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये शिकण्याची संधी आहे. आपण त्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतो हे अधिक महत्त्वाचे आहे. साहित्य माणसाला जगण्यासाठी दृष्टी देते. घनश्याम पाटील विक्रमवीर आहेत. एकाच वेळेस अनेक पुस्तकांचे प्रकाशन करण्याचा सोहळा करणे हे लिहित्या हाताना बळ देणारे आहे. हल्ली चांगल्या गोष्टी खऱ्या आहेत याबद्दल शंका येते असा काळ आहे. माध्यमातून चांगले येत नाही. आपल्या भोवतालमध्ये नैराश्य असते तेव्हा लेखकांनी आशेचा किरण दाखवणे महत्त्वाचे आहे. ध्येयवृत्तीने काम महत्त्वाचे असून चांगले साहित्य रसिकांपर्यंत पोहचवणे महत्त्वाचे आहे. संदर्भ सोडून सांगितले जाते तेव्हा सत्य नाही हे लक्षात घ्यायला हवे. शिकण्याची वृत्ती असल्यास भोवतालमध्ये शिकण्यासारखे खूप काही आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले.

न्यायाधीश सुनील वेदपाठक म्हणाले की, मनामध्ये प्रत्येक जन संघर्ष करत असतो. त्याचं स्वरूप भिन्न असतं पण असे संघर्ष समजावून घेणे त्याचवेळी त्यामध्ये असलेल्या चांगल्या माणसांची व्यक्तिचित्रे वाचणे या गोष्टीही मनाला आनंद देणाऱ्या आहेत. ‘पाटी पेन्सिल’ हे पुस्तक शिक्षणाचा व्यापक पट उलगडून दाखविणारे आहे. शिक्षण घेत असताना आपण जीवन जगत नाही. जीवन जगत असताना शिक्षण घेतले. हे चित्र बदलण्याची गरज आहे. शिक्षणाचा विचार महत्त्वाचा आहे. केवळ साक्षरतेपेक्षाही शिक्षणातून उत्तम नागरिक हवा आहे ही भूमिका महत्त्वाची आहे. साक्षरतेचा विचार नको, शहाणपण हवे असे मत व्यक्त केले. यावेळी स्तंभ लेखक संदीप वाकचौरे यांचे पाटी पेन्सिल, चंद्रलेखा बेलसरे- पाठलाग, नाशिर शेख- इस्लाम खतरे मे है, रवींद्र खंदारे- संघर्ष हेच जीवन, मनोहर इनामदार यांचे गवसनी या पाच पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
घनश्याम पाटील यांनी पुस्तकांविषयी विवेचन करून प्रास्तविक केले. लेखकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव गिर यांनी केले. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते आबा बागुल, नामवंत विधिज्ञ प्रताप परदेशी, रामदास नेहूलकर,प्रकाश रेणुसे, रवींद्र कामठे, अरुण कमळापूरकर, विद्याधर शुक्ल, पोपट काळे, प्रवीण शिरसाट, अजय रावत, अरुण जाधव, ज्ञानेश्वर थोरात आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button