सहा महिण्यांचे मानधन थकले, आशा कर्मचाऱ्यांची अकोल्यात तीव्र निदर्शने !

!
अकोले प्रतिनिधी
कोविड महामारीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार्या आशा कर्मचाऱ्यांचे मानधन गेल्या सहा महिन्यापासून थकविण्यात आले आहे. आरोग्य क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना यामुळे त्यांचे कुटुंब चालवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आशा कर्मचाऱ्यांवरील या अन्यायाच्या विरोधामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रभर सिटू कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची हाक दिली होती. सिटूच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी सिटू कर्मचारी संघटनेच्या वतीने आशा कर्मचारी संपावर गेल्या. अकोले व संगमनेर तालुक्यामध्ये सिटू प्रणित आशा कर्मचारी संघटनेच्यावतीने आशा कर्मचाऱ्यांनी तीव्र निदर्शने करून आपला संताप व्यक्त केला. अकोले पंचायत समिती येथे शेकडो आशा कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढत तीव्र निदर्शने केली. अकोले येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयांमध्ये मोठ्या संख्येने आशा कर्मचारी एकत्र आल्या. थकित मानधन तातडीने जमा करा, वाढीव मानधन आशा कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा, वाढीव कामाचा बोजा देणे बंद करा या मागण्यांच्या घोषणा देत आशा कर्मचाऱ्यांनी अकोले शहराचा परिसर दणाणून सोडला. आशा कर्मचार्यांच्या संपासाठी सिटू संघटनेने अकोले व संगमनेर दोन्ही तालुक्यांमध्ये व्यापक तयारी केली होती. अकोले येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात मोर्चाच्या तयारीसाठी मेळावा घेण्यात आला होता. संगमनेर तालुक्यातील किसान सभेच्या कार्यालयांमध्ये संगमनेर तालुक्यातील आशांचा मेळावा घेऊन संपाची तयारी करण्यात आली होती. शासनाने आशा कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवले नाहीत व मानधन वर्ग केले नाही तर बेमुदत संपाचे हत्यार उपसले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
संगीता साळवे, अस्मिता कोते, वैशाली सुरसे, सुनीता गजे, अनिता शिंदे, फरीदा पठाण, अनिता वाकचौरे, स्वाती ताजणे, संजीवनी लगड, वर्षा बंदावने यांनी संप व आंदोलनाचे नेतृत्व केले. किसान सभेच्या वतीने डॉ. अजित नवले, माकप च्या वतीने एकनाथ मेंगाळ व ज्ञानेश्वर काकड यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.