सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारून यशाकडे झेप घ्या – आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे

रायला महोत्सवाचा समारोप
नाशिक : सध्याच्या स्पर्धेच्या युगात चांगल्या दर्जाचे उच्च शिक्षण घेण्याची गरज आहे. ज्ञानाची शिदोरी अंगी करताना जीवनात आपल्याला काय व्हायचे आणि काय करायचे याचे ध्येय निश्चित करायला पाहिजे. यासाठी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून यशाकडे झेप घेतल्यास जीवनात यशस्वी होता येते असे मत आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी केले.
बुद्धीप्रेरक खेळ, ध्यानयोग, क्रीडा मार्गदर्शन, झुम्बा, दृक श्राव्य स्टुडिओ, सह्याद्री फार्म, कृषि प्रक्षेत्र भेट, प्रेरणादायी व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांनी रायला महोत्सव २०२३ चा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला. परिस्थितीवर मात करून शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदावर पोहोचू शकतो याचा आत्मविश्वास मुलांना मिळाला. आता रडायचे नाही तर चांगले शिक्षण घेवून लढायचे, चांगले शिक्षक घेवून यश मिळवायचे आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचं असा निर्धार सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
ग्रामीण आदिवासी भागातील मुलांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावेत, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा आणि त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळावी या उद्देशाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठात तीन दिवसीय ‘रायला’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोप रविवारी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रफुल बरडिया, कम्युनिटी सर्व्हिस संचालक तथा रायला महोत्सवाचे समन्वयक हेमराज राजपूत, जनसंपर्क संचालक संतोष साबळे, ज्येष्ठ संचालक अनिल सुकेनकर, सतीश मंडोरा, डॉ. अक्षिता बुरड उपस्थित होते.
यावेळी सर्वोत्कृष्ट रायला अवार्ड आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यात वाघेरा आश्रमशाळेची विद्यार्थिनी भाग्यश्री बरड हिला (विजेती) तर धोंडेगाव आश्रमशाळेचा चंद्रकांत भोये (उपविजेता) यांचा सन्मान करण्यात आला ठरला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक करताना आयुक्त नयना गुंडे म्हणाल्या, रोटरी क्लबचे कार्य चांगले असून पुढील काळात आदिवासी विकास विभागदेखील रोटरी संस्थेसोबत काम करण्यासाठी पुढाकार देईल. आदिवासी भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रायला महोत्सवात सहभागी कसे करता येईल यासाठी प्रयत्न केले जाईल. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सकारात्मक दृष्टिकोन असणे अत्यंत महत्वाचे आहे. रायला महोत्सवातून चांगल्या ज्ञानाची शिदोरी घेवून जात आहात ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक आश्रमशाळा कुकुडणे, विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा वाघेरा अशा एकूण २ आश्रमशाळा आणि मुक्त विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेच्या अशा एकूण १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
तीन दिवसांच्या या शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना तज्ञांची मार्गदर्शने लाभली. आपणसुद्धा परिस्थितीवर मात करून शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदावर पोहोचू शकतो याचा आत्मविश्वास मुलांना मिळाला. आता रडायचे नाही तर चांगले शिक्षण घेवून लढायचे आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचं असा निर्धार सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे सहभागी विद्यार्थ्याना आपल्याला आता पुन्हा आपल्या गावी जावे लागणार या भावनेतून सर्वांनाच गहिवरून आले होते. तर अनेकांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. इथला निसर्गरम्य परिसर, उत्तम जेवण, आपुलकीची, प्रेमाची शाबासकीची थाप, कलागुणांना मिळालेली दाद अशा निरनिराळ्या उपक्रमांमुळे मुले अक्षरशः भारावून गेली होती. प्रारंभी प्रफुल बरडिया यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी दिलीपसिंह बेनिवाल, विनायक आणि ऊर्मिला देवधर, कमलाकर आणि कीर्ती टाक, डॉ. नागेश मदनुरकर, मधुकर गवळी आदी उपस्थित होते. दमयंती बरडिया यांनी परिचय करून दिला. हेमराज राजपूत यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा राजपूत यांनी केले.
रायला महोत्सवात विजेत्या ठरलेल्या भाग्यश्री बरड ही आश्रमशाळेत इयत्ता ११वीत शिकणारी विद्यार्थिनी असून तिच्या पुढील शिक्षणाचे पालकत्व रोटरीचे पदाधिकारी तथा माजी परिवहन अधिकारी सतीश मंडोरा यांनी स्वीकारले. श्री. मंडोरा यांनी शैक्षणिक पालकत्व स्वीकारल्याबद्दल आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
- – रायला महोत्सवात जीवनाकडे बघण्याचा नवा दृषटीकोन मिळाला. शिक्षणामुळे आपला, कुटुंबाचा विकास कसा होतो हे शिकायला मिळाले. आपल्यातील क्षमता काय आहेत हे ओळखून सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास जीवनात यश मिळविता येते याची प्रचिती आली. निरनिराळे खेळ, योगा, स्वच्छता, व्यसनाधीनता, चांगले वाईट, करिअर मंत्र, मनोरंजन आणि बरंच काही इथे शिकायला मिळाले अनुभवता आले. त्यामुळे इथून जावेसे वाटत नाही.
- – भाग्यश्री बरड, विद्यार्थिनी, वाघेरा आश्रमशाळा.