भंडारदरा परिसरात बिबट्याचा मृत्यू

संजय महानोर
भंडारदरा / प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परीसरात पाण्याच्या टाकीत पडुन एका बिबट्याचा मृत्यु झाला असुन सदर बिबट्याच्या मृत्यने परीसरात खळबळ उडाली आहे .
अकोले तालुक्यातील पिंपळाची वाडी येथे एका शेतक-याच्या शेतात पाटबंधारे विभागाच्या पाण्याच्या टाकीत तीन वर्षीय बिबट्याचा मृतदेह आढळून आला आहे .ही पाण्याची टाकी पांटबंधारे विभागाची असुन याद्वारे परीसरातील शेतक-यांना शेतासाठी पाणी वाटप केले जाते .जमिनीपासुन एक मिटर ही टाकी उंच असुन मोठ्या प्रमाणात खोल आहे .टाकीजवळच कोंबड्यांचा बिबट्याने फडशा पाडल्याचे दिसुन येत असुन हा बिबट्या टाकीवर खेळता खेळता किंवा सावजाचा पाठलाग करताना पडला असल्याचा अंदाज बांधला जात आहे .पाण्याच्या टाकीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने बिबट्याला पाण्याच्या टाकीच्या वर चढणे शक्य झाले नसावे .परीसरातील हभप एकनाथ महाराज भांगरे यांनी सदर घटनेची माहीती प्रादेशिक वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी संदीप पाटील यांना दुरध्वनीवरुन दिल्यानंतर तात्काळ राजुर कार्यालयास सदर घटनेची माहीती कळविण्यात आली . राजुर कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे यांच्या अधिपत्याखाली वनपरीमंडळ अधिकारी मधुकर चव्हाण , वनरक्षक बहिरु बेनके , शंकर बेणके , बाळु उघडे , रघुनाथ धादवड , विठ्ठल गभाले , भिमा बांडे , यांनी जागेवर जाऊन पंचनामा करत गुन्हा दाखल करुन अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे .सदर बिबट्याच्या मृतदेहाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी संदीप पाटील यांच्या आदेशानुसार राजुर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयात शवविच्छेदन करत मृतदेहाला अग्निडाग देण्यात आला .