इतर

ताजनापूर लिफ्ट क्रमांक दोन बंधारे भरून द्यावेत अन्यथा जलसंपदा कार्यालयासमोर बेमुदत बैठा सत्याग्रह


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील महत्वपूर्ण अशा ताजनापुर लिफ्ट टप्पा क्र. ०२ च्या अंतर्गत असणाऱ्या १७ गावातील तलाव व बंधारे भरून मिळवेत अन्यथा शेतकरी जलसंपदा कार्यालयासमोर बेमुदत बैठा सत्याग्रह करतील अशा मागणीचे जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांच्या अध्यक्षतेखाली ताजनापुर लिफ्ट टप्पा क्र.२ मधील १७ गावातील शेतकऱ्यांनी अहमदनगर मध्यम प्रकल्प विभागाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक श्री.बा.क.शेटे साहेब यांना आज अहमदनगर येथे निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदनात म्हटले आहे की, ताजनापूर लिफ्ट योजनेचे जनक असलेले जगन्नाथ कान्होजी उर्फ आबासाहेब काकडे यांच्या संघर्षाला अखेर मूर्त स्वरूप आले आहे. १९६५ सालापासून शेवगाव तालुक्याचा तीन पिढ्यांचा लढा आता पूर्णत्वाला आलेला आहे.
आपल्याला कल्पना आहे, जायकवाडी धरणाच्या जलाशयालगतच्या गावांसाठी ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र. ०२ योजना होती. अॅड.शिवाजीराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली १९९९ पासून चालत आलेल्या संघर्षामुळे शेवगाव तालुक्यातील १७ दुष्काळी गावांचा म्हणजे प्रभूवाडगाव, गदेवाडी, नजीक बाभूळगाव, चापडगाव, राक्षी, ठाकूर निमगाव माळेगाव-ने, वरखेड, सोनेसांगवी, हसनापूर, कोळगाव, मंगरूळ खुर्द, मंगरूळ बुद्रुक, आंतरवाली या १७ गावांचा समावेश झालेला आहे.

तत्कालीन जलसंपदा मंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्याकडून दि.२५/०४/२००७ रोजी या योजनेच्या संदर्भात १७ दुष्काळी गावांचा समावेश करण्याचे आदेश मिळविण्यास कृती समितीला यश आले.
आता योजनेचे ठिबक सिंचनच्या कामाव्यतिरिक्त बरीचशी कामे जवळपास पूर्ण होत आलेले आहे. आमच्या माहितीनुसार ठिबक सिंचनचे टेंडर निघाले नाही. ठिबक सिंचनचे काम अपुरे असून या कामाचे टेंडर निघण्यास व याकामासाठी बराचसा कालखंड जाणार आहे.
शेवगाव तालुक्याने जायकवाडी प्रकल्पामध्ये २९ सुपीक गावे गमावली आहेत. या बदल्यात जायकवाडी धरणामध्ये ३.८ टी.एम.सी. पाणी शेवगाव तालुक्याच्या ताजनापुर लिफ्ट या नावाखाली राखीव ठेवण्यात आलेले आहे. हेच पाणी जर २०-२५ वर्षापूर्वी शेवगाव तालुक्याला मिळाले असते तर अब्जावधीचे उत्पन्न शेवगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांना मिळाले असते. परंतु केवळ विलंबामुळे अब्जावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे.

आजतागायतच्या लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष व नोकरशाहीच्या हेळसांडीमुळे हा प्रकल्प रखडला आहे. अद्याप १७ गावात ठिबक सिंचन करण्याचे बाकी आहे. अशा परिस्थितीमध्ये आता या योजनेबाबत नव्याने विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.यावर्षी पाऊस कमी झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये लोकांना पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. ताजनापूर लिफ्ट टप्पा नं ०२ साठी कोट्यावधी रुपये खर्च करून पंपहाउस बसविले गेलेले आहेत. पाईपलाईन झालेल्या आहेत, १७ गावातील पाच विविध ठिकाणी मोठमोठ्या पाण्याच्या टाक्याही उभारण्यात आलेल्या आहेत.
या १७ गावातील तलाव व बंधारे खानापूर लिफ्ट (ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र.०२) मधून भरून देण्यात यावेत. जेणे करून या १७ गावातील शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेता येतील. त्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, शेतकऱ्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न बऱ्यापैकी वाढण्यास मदत होईल. या वर्षी शेवगाव तालुक्यातील एकूण ०५ मंडलातील गावे दुष्काळी पट्यातील आहेत. ही मंडले ‘दुष्काळ सदृश स्थितीतील गावे’ म्हणून जाहीर केलेली आहेत. ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र.०२ मधील बहुतांशी गावे दुष्काळसदृश गावे म्हणून जाहीर करण्यात आलेली आहेत.
सबब अशा वेळेला अधिक दिरंगाई न करता शेवगाव तालुक्याच्या नावाने जायकवाडी धरणात असलेले ताजनापूर लिफ्टच्या दुसऱ्या टप्याचे २.२ टी.एम.सी पाणी या १७ गावातील सर्व तलाव व बंधाऱ्यामध्ये तातडीने सोडण्यात यावे.

आपण याबाबत तातडीने कार्यवाही न केल्यास जलसंपदा खात्यापुढे शेवगाव तालुक्यातील शेतकरी बेमुदत बैठा सत्याग्रह करतील. असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी रामकिसन मडके, सोनेसांगवीचे सरपंच, जालिंदर कापसे, उपसरपंच अंतरवाली बू, रामजी मडके, रामकिसन सांगळे आदी प्रमुख उपस्थितीत होते. निवेदनाच्या प्रती मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य. मा.ना.अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. विभागीय कार्यालय, जलसंपदा विभाग, नाशिक. यांना ईमेलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button