इतर

संगमनेरसह राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात आमदार सत्यजित तांबेनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट



मुंबई – उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यासाठी महत्वाच्या असलेल्या अनेक विषयांवर गेले अनेक दिवस विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे पाठपुरावा करत आहे. यातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत, अनेक प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर तांबे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा नव्याने पदभार स्वीकारलेल्या देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मागण्यांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करत निवेदन दिले.
संगमनेरसह राज्यातील विविध प्रश्नांसाठी आमदार तांबे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या भेटी घेत आहेत. संबंधित मंत्र्यांकडून विविध विषयांचा पाठपुरावा त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू केला आहे.
आपल्या कामाचे प्रगती पुस्तक मांडणारे ते राज्यातील एकमेव आमदार आहेत. सभागृहात आणि सभागृहाबाहेर केलेल्या कामांचा आढावा ते आपल्या मतदारांना समाज माध्यमातून सातत्याने देत असतात. सभागृहात अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित करत समस्यांना वाचा फोडली आहे.
नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्यात डॉक्टरांप्रमाणे वकिलांच्या संरक्षणासाठी कायदा करण्याची मागणी केली आहे. संगमनेर मधील पोलीस वसाहत प्रकल्पाचा आराखडा आधुनिक पद्धतीने तयार करून हा प्रकल्प जलदरीत्या मुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण करण्याची मागणी तांबे यांनी केली आहे.
राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांच्या व सीसीएमपी डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत बैठक आयोजित करावी. या बैठकीच्या माध्यमातून डॉक्टरांचे प्रश्न मार्गी लागू शकतील. अहमदनगरच्या कौटुंबिक न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीशांची नेमणूक करावी. निळवंडे प्रकल्पाच्या नियोजनाबाबत काही सूचना व मागण्या त्यांनी यावेळी केल्या.
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदान व अंशतः अनुदानावर नियुक्त असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिष्टमंडळास वेळ देण्याची, ग्रामीण भागातील महाराष्ट्र रुरल ऍडव्हर्टायझिंग असोसिएशनच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक आयोजित करण्याची मागणी तांबे यांनी केली आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत संगमनेर शहरातून वाहणाऱ्या म्हाळुंगी नदी सुधार प्रकल्पासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी निधी मंजूर करावा. या माध्यमातून म्हाळुंगी नदी सुधार प्रकल्प राबविता येईल. तांबे यांनी राज्यातील लघु वृत्तपत्र क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक आयोजित करण्याची देखील मागणी केली.
या प्रमुख मागण्यांसह तांबे यांनी राज्याच्या हिताच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती त्यांना केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button