इतर

सर्वच एकल महिलांचे संघटन करण्याचा पुनर्वसन समितीचा निर्णय

कोरोनात विधवा झालेल्या महिलांसाठी पुनर्वसन काम केल्यावर आता महाराष्ट्रातील सर्वच एकल महिलांचे संघटन करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा निर्धार शिर्डी येथे झालेल्या कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या राज्य बैठकीत घेण्यात आला.

कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या माध्यमातून राज्यातील ६५ स्वयंसेवी संस्था एकत्र आल्या व त्यांनी राज्यातील ८३ तालुक्यातील ६००० महिलांच्या पुनर्वसनासाठी हेरंब कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली काम केले. महिलांना ३ कोटी रुपयांची रोख मदत मिळवून दिली व ४००० महिलांना विविध योजना मिळवून दिल्या.
या सर्व संस्थांची बैठक शिर्डी येथे दिनांक १८व १९ मार्च रोजी आयोजित केली होती. या बैठकीला राज्याच्या गडचिरोली,नागपूर,नांदेड,कोल्हापूर,बीड,धाराशिव,धुळे,पुणे यासह १६ जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यातील सर्व विधवा,घटस्फोटित, परित्यक्ता महिलांची समस्या गंभीर असल्याने कोरोना विधवांच्या सोबत या महिलांचे संघटन उभारण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यातील शाखेला ‘ साऊ एकल महिला समिती’ हे नाव दिले जाणार आहे. राज्याच्या किमान १०० तालुक्यात प्रत्येकी २०० एकल महिलांची नोंदणी करून २०,०००एकल महिलांचे संघटन उभारण्याचा प्रस्ताव राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी मांडला व सर्वांनी त्यांना अनुमोदन दिले. सावित्रीबाई फुले यांनी विधवा महिलांसाठी केलेले कार्य लक्षात घेवून त्यांच्या नावाने हे संघटन काम करील असे ठरवण्यात आले.या कामात ज्या संस्थांना सहभागी व्हायचे असेल त्यानी संपर्क करावा असेही आवाहन करण्यात आले.

महिलांचे रोजगार या विषयावर बैठकीत विशेष चर्चा झाली. त्यासाठी दिल्ली येथील निती आयोगाचे प्रकल्प अधिकारी आनंदमुनी यांनी सविस्तर रोजगार संदर्भात मार्गदर्शन केले. महिलांना रोजगार मिळवून देणे ,शासकीय योजना मिळवून देणे व मालमत्ता अधिकार मिळवणे यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले.

विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी
जे पुरुष अपत्य असलेल्या विधवा महिलांशी विवाह करतील त्या मुला मुलींच्या नावावर सरकारने शिक्षणासाठी एक लाख रुपयांची
ठेव पावती करावी असा विनंती करणारा ठराव मंजूर करण्यात आला.
गेली दोन वर्षे सर्व संस्थांनी जे काम केले त्या कामाचा अहवाल कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

या बैठकीचे नियोजन संगीता मालकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button