अकोल्यात हिंदू नवं वर्षदिनी भव्य शोभायात्रा

अकोले प्रतिनिधी
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाणीजधाम रत्नागिरी यांच्या दिव्य प्रेरणेने राज्यभर हिंदू नववर्ष, चैत्र प्रतिपदा व वसंत ऋतुचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा, यशाचा व कीर्तीचा तथा प्रभू रामचंद्र रावणाला पराभूत करून अयोध्याला आगमन केल्याचा दिवस असल्यामुळे हा विजयाचा दिवस मानला जातो.
भारतीय संस्कृतीचे जतन व वारसा पुढील पिढीसाठी आदर्श राहावा यासाठी सालाबाद प्रमाणे संप्रदायाचे गुरुबंधू-भगिनी सांप्रदायिक वेशभूषेत ३० मार्चला सकाळी ७:०० वाजता जिल्हा निहाय शोभायात्रा काढून जल्लोषात स्वागत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अकोले येथील बाजारतळ येथून महात्मा फुले चौक मार्गे अंबिका माता लॉन्स या ठिकाणी या भव्य शोभा यात्रेची सांगता होणार आहे.
या शोभायात्रेत जगद्गुरुश्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांची प्रतिमा, प्रभू राम दरबार, संत मेळा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत घोडेस्वार, वीरांगणा लक्ष्मीबाई, क्रांतिवीर भारत माता यांच्या समवेत अनेक वारकरी सांप्रदायाच्या वेशभूषेतील असलेले पारंपारिक नृत्य पथक सहभागी होणार आहेत. सोबत प्रेम, आनंद व उत्साह पूर्व युवा युवती कुटुंबाकडून बाईक रॅली तसेच भजनी मंडळ, कलश धारी, गुढी धारी महिला भगिनी, झेंडे, पताका, ढोल-ताशाचा गजर आकर्षणाचा केंद्र ठरणार आहे. या यात्रेत जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाचे जनकल्याणकारी, सामाजिक उपक्रमाची जनजागृती, केली जाणार असून रॅलीत शुद्ध पिण्याचे पाणी व समारोप ठिकाणी महाप्रसाद ची व्यवस्था आयोजकांनी केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सर्व भाविक भक्तगणांनी सहभागी होऊन या शुभ दिनाचा, यशाचा, कीर्तीचा व विजयाचा आनंद घ्यावा असे आवाहन उत्तर अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष, जिल्हा निरीक्षक, जिल्हा सेवा समिती व ज.न.म. प्रवचनकार यांनी केले आहे.