वडगाव लांडगा येथील शाळेचे मुख्याध्यापक रमेश कानवडे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार !

संगमनेर, ता. १३- प्रतिनीधी
संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील आदर्श इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक रमेश कानवडे यांना अहिल्यानगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोकराव कडूस, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, योजना विभागाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब घुगे, वेतन पथकाचे अधीक्षक रामदास म्हस्के, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी अरुण धामणे, के. एन. चौधरी, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित, कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवणे, सरचिटणीस मिथुन डोंगरे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मुख्याध्यापक सर्वांना जोडणारा दुवा असून शाळेचे नेतृत्व असते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मुख्याध्यापकांनी ताकदीने काम करण्याचे आवाहन शिक्षण संचालक पालकर यांनी यावेळी बोलताना केले.
रमेश कानवडे गेल्या ३४ वर्षांपासून उपक्रमशील विज्ञान शिक्षक म्हणून परिचित आहेत. गेल्या ५ वर्षांपासून ते मुख्याध्यापक म्हणून वडगाव येथील आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ग्रामस्थ आणि संस्थेच्या मदतीने भौतिक सुविधा उभारत शाळेचा चेहरामोहरा बदलला आहे. शैक्षणिक गुणवत्तेबाबत ते आग्रही असतात. संगमनेर तालुका गणित-विज्ञान शिक्षक संघाचे अध्यक्ष आणि सचिव म्हणून त्यांनी काही वर्ष कामकाज पाहिले आहे. संगमनेर तालुक्यातील ज्ञान विज्ञान या विज्ञान प्रसार व प्रचारासाठी अग्रणी असलेल्या संस्थेचे ते सक्रिय सदस्य आहेत. संघटनेच्या माध्यमातून विज्ञान प्रदर्शन, सामान्य ज्ञान स्पर्धा, बाल विज्ञान परिषद यासह विज्ञान प्रसारासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या विज्ञानातील प्रतिकृती राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं काम उल्लेखनीय असून काही खेळांमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर नैपुण्य मिळवलेले आहे.
शालेय पातळीवरच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी श्री. कानवडे आणि सहकारी शिक्षक विशेष तयारी करून घेतात. त्यासाठी जादा तास घेतात. एनएमएमएस परीक्षेत संगमनेर तालुक्यात सारथी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी वडगाव लांडगा शाळेचे मोठ्या संख्येने असतात. स्कॉलरशिप, नवोदय, बाल विज्ञान परिषद, कला क्रीडा व इतर अनेक क्षेत्रात कानवडे यांच्या नेतृत्त्वाखाली ग्रामीण भागातल्या विद्यालयात हे विशेष उल्लेखनीय काम सुरू आहे. कानवडे हे उपक्रमशील आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. मुख्याध्यापक म्हणून त्यांनी कामाचा अल्पावधीत ठसा उमटविला असून, शालेय शिक्षण विभागाचे प्रशासन, ग्रामस्थ, ज्ञानोदय शिक्षण संस्था, सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी, पालक यांच्याशी उचित समन्वय साधून कामकाज करण्याची हातोटी आणि कौशल्य त्यांच्याकडे आहे. याच कामाची पावती म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल कानवडे यांचे अभिनंदन होत आहे.