वडगाव सावताळ येथील वन विभागाच्या क्षेत्रात अतिक्रमण

अतिक्रमण करणाऱ्याला कोणाचा ?
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील वडगाव सावताळ येथील सर्वे नंबर ८१ मध्ये वन विभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर स्थानिकांनी अतिक्रमण केले असून अतिक्रमाणासाठी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. तरी या अतिक्रमण धारकांवर कारवाई करून या कत्तल झालेल्या झाडांची तातडीने पंचनामे करावे अशी लेखी मागणी वडगाव सावताळ ग्रामस्थांच्यावतीने भाऊ विठ्ठल शिंदे, गुलाब हरीभाऊ शिंदे, विठ्ठल रामभाऊ ठाणगे यांनी लेखी निवेदनाद्वारे वन विभागाला केली आहे. यासंबंधीचे निवेदन टाकळी ढोकेश्वर येथील वनविभागाचे वनक्षेत्रपाल यांना देण्यात आले आहे.
वडगाव सावताळ येथील सर्वे नंबर ८१ अतिक्रमण तातडीने हटवावे तसेच वन विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी या निवेदनात दिला आहे. या निवेदनात म्हटले आहे की, वडगांव सावताळ येथील सर्व्हे नंबर ८१ हा वनविभागाच्या मालकीचा असून त्या सर्व्हे नंबरमध्ये पश्चिम बाजूने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व वृक्षतोड झालेली आहे. वडगाव सावताळ वनस्थापन कमिटी यांच्याकडून उपरोक्त क्षेत्राची देखभाल होत नसेल तर त्यांचे राजीनामे तरी सदर सर्व्हे नंबरची योग्य पद्धतीने मोजणी व हद्द निश्चिती करुन मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमणे काढावीत व वृक्षतोड केलेल्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई त्वरीत व्हावी अशी मागणी या निवेदनात भाऊ विठ्ठल शिंदे, गुलाब हरीभाऊ शिंदे, विठ्ठल रामभाऊ ठाणगे यांनी लेखी निवेदनाद्वारे वन विभागाला केली आहे.