नाशिक शहरातील १० हजार विद्यार्थ्यांना होणार चष्म्याचे वाटप

रोटरी उज्ज्वल दृष्टी अभियानाचा शुभारंभ
नाशिक दि ३१ रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष सीए प्रफुल बरडिया यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारताना आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांची मोफत डोळे तपासणी आणि मोफत चष्मे देण्याचा मानस व्यक्त केला होता. या उपक्रमाचा शुभारंभ रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल डॉ. आनंद झुंझुनुवाला यांच्या हस्ते लोकनेते व्यंकटराव हिरे शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत डोळे तपासणीनंतर प्रतिनिधीक २० विद्यार्थ्याना चष्मे वाटप केले. उज्ज्वल दृष्टी अभियानाच्या माध्यमातून नाशिक शहर व परिसरात असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांतील मुलांचे अद्ययावत मशिनद्वारे डोळे तपासणीनंतर सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना अचूक चष्मा बनवून देण्यात येणार आहे.
एका पाहणीनुसार कोरोना काळात सोशल मीडियाच्या अतिवापराने अनेक विद्यार्थ्यांचे डोळे खराब झाले असून, त्यांचा नंबर वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर व येणाऱ्या काळात समस्यांचा विचार करत रोटरी क्लब ऑफ नाशिकने आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांचे मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे देण्याच्या उपक्रमाची सुरूवात लोकनेते व्यंकटराव हिरे शाळेतून केली. सुमारे ७०० मुलांची प्राथमिक डोळे तपासणी केल्यानंतर १७२ विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे लागणार आहेत. तसेच आधार आश्रमातील मुलींचीसुद्धा डोळे तपासणी केली असून त्यांनाही लवकरच चष्मे वितरित करण्यात येणार आहे.
संपूर्ण वर्षभर चालणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पास नाशिक महानगरपालिका शाळा, रोटरी क्लब नाशिकच्या इंटरॅक्ट शाळा, मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या नाशिक शहरातील शाळा तसेच डॉ. शरद पाटील यांचे कल्पतरू फाउंडेशन इत्यादी संस्थांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
हा उपक्रम राबविण्यासाठी अध्यक्ष सीए प्रफुल बरडिया, सचिव ओमप्रकाश रावत, प्रकल्प संयोजक उर्मी दिनानी, प्रणव गाडगीळ, सीएसआर संचालक कमलाकर टाक, डॉ. अर्पित शाह, डॉ. स्वप्निल विधाते, जेष्ठ संचालक विजय दिनानी, दिनेश शर्मा, कीर्ती टाक, रवी महादेवकर, डॉ. सुनीता संकलेचा, सतिश मंडोरा आणि रोटरीचे संचालक मंडळ कार्यरत आहे.