नाशिक रोटरी क्लबतर्फे पंचवटी पांजरपोळमध्ये वृक्षारोपण

नाशिक प्रतिनधी
रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने चुंचाळे येथील नाशिक पंचवटी पांजरपोळ संस्थेच्या परिसरात शुक्रवारी (दि. १) रोजी वृक्षारोपण करण्यात आले. कडुनिंबाची सुमारे २०० झाडांची यावेळी लागवड करण्यात आली.
रोटरी क्लबच्या नवीन अध्यक्षांच्या कार्यकाळाची सुरुवात ही १ जुलैस वृक्ष लागवडीने होत असते. गेल्या ७७ वर्षांपासूनची क्लबची ही परंपरा कायम ठेवत, वाढत्या प्रदूषणास आळा बसावा आणि पर्यावरणाचे संवर्धन यशस्वीरीत्या करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने शुक्रवारी नाशिक पंचवटी पांजरपोळ संस्थेच्या चुंचाळे येथील परिसरात रोटरी पदाधिकारी आणि सदस्यांच्या हस्ते कडुनिंबाच्या २०० हून अधिक झाडांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे वृक्ष लागवडीनंतर या रोपांची जोपासना पांजरपोळ संस्था करणार आहे. प्रारंभी पांजरपोळ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच त्यांच्या १५०० एकर प्रक्षेत्रावर राबविण्यात येणाऱ्या निरनिराळ्या प्रकल्पांना ट्रॅक्टरमधून भेट घडवून आणली. अतिशय आनंदी आणि प्रसन्न वातावरणात वृक्ष लागवड केली.
या उपक्रमास रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष सीए प्रफुल बरडिया, सचिव ओमप्रकाश रावत, डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. धनंजय माने, डॉ. पांढरे, डॉ. अक्षिता आणि डॉ. हितेश बुरड, अमर शाह, डॉ. प्रकाश झांबरे, सागर भदाने, दमयंती बरडीया, विजय दिनानी, मुग्धा लेले, कम्युनिटी सर्व्हिस संचालक हेमराज राजपूत, डॉ. श्रिया कुलकर्णी, मंगेश अपशंकर, विनायक देवधर, जनसंपर्क संचालक संतोष साबळे, मंथ लीडर स्मिता अपशंकर आणि वृषाली ब्राह्मणकर यांच्यासह रोटरी पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
……………………………………