स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या अकोल्यातील वारकऱ्याची पंढरपुर वारी!

डोंगरगाव ते पंढरपूर मोटारसायकलवरून वारी
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील हरीभाऊ उगले हे आषाढी एकादशीनिमित्त ‘वारी स्वच्छतेची, माझ्या पांडुरंगाची’ वारी करत आहे. या माध्यमातून ते स्वच्छता आणि आरोग्याचा संदेश देत आहेत.
डोंगरगाव येथील रहिवासी व वारकरी हरीभाऊ उगले यांनी स्वच्छतेचा वसा घेतला आहे. संत गाडगेबाबांच्या विचारांचा त्यांच्या मोठा प्रभाव पडलेला आहे. त्यादृष्टीनेच ते राज्यभर स्वखर्चाने फिरत असून स्वच्छतेचा संदेश देत आहे. आता देखील महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाची भेट स्वच्छतेच्या वारीतून घेण्यासाठी प्रवास सुरू केला आहे. डोंगरगाव ते पंढरपूर अशी त्यांची मोटारसायकलवरून वारी सुरू आहे. गाडीला गाडगेबाबा यांच्यासारखे सर्व स्वच्छतेचे झाडू, बादली असे साहित्य बांधलेले आहे. तर गाडीच्या पाठीमागे ‘वारी स्वच्छतेची, माझ्या पांडुरंगाची’ आणि त्यांचे नाव व संपर्क क्रमांक असलेला फलक लावलेला आहे.
या स्वच्छतेच्या वारीतून मार्गावरील गावांत स्वच्छता करत आहे. तेथील शाळा व विद्यालयात जावून विद्यार्थ्यांनाही स्वच्छता व आरोग्याचे महत्त्व पटवून देत आहेत. तसेच नागरिकांशी देखील चर्चा करुन स्वच्छतेला प्राधान्य द्या, पाणी अडवा, झाडे लावा असे आवाहन करत आहे. दरम्यान, दरवर्षी पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी राज्यभरातील लाखो वारकरी पायी वारी करत पंढरपूर गाठतात. यातील वारकर्यांची अनेक व्यक्ती, सेवाभावी संस्था मनोभावे सेवा करतात. डॉक्टरही मोफत उपचार करतात. आधुनिक गाडगेबाबा असलेले हरीभाऊ उगले हे ‘वारी स्वच्छतेची, माझ्या पांडुरंगाची’मधून मनोभावे जनसेवा करत आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे