महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत वासुदेव फडके यांच्या कार्यावर कीर्तन!

आषाढी एकादशी निमित्त
पालखी सोहळा सम्पन्न
पुणे – आषाढी एकादशी आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी देशासाठी केलेल्या कार्याचे आणि बलिदानाचे रोमांचक चित्र युवा कीर्तनकार ईशा महल्ले हिने उभे केले. यावेळी उपस्थित असलेल्या वसतिगृहातील सुमारे ९०० मुली मंत्रमुग्ध होऊन भारावून गेल्या होत्या.

आषाढी एकादशी च्या पूर्व संध्येला शनिवारी ह. भ. प. ईशाताई महल्ले यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम महिलाश्रम वसतिगृहात ठेवण्यात आला होता. फडके यांच्या आयुष्यातील अनेक धाडसी प्रसंग त्यांनी प्रवाही शैलीत सांगून विद्यार्थीनींना खिळवून ठेवले होते. दिव्या लांडगे आणि गौरी शितोळे या विद्यार्थीनींनी सूत्रसंचालन केले. वसतिगृहाच्या प्रमुख सुमन तांबे-यादव यांनी प्रास्ताविक केले.
रविवारी सकाळी आषाढी एकादशी निमित्त वसतिगृहाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात विद्यार्थीनी उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.
