पारनेर-नगर मतदार संघातील १४ गावांना २२ कोटी ७७ लाख ६१ हजार रूपयांचा निधी- निलेश लंके

दत्ता ठुबे/पारनेर : प्रतिनिधी
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सन २०२१-२२ कृती आराखडयातील पारनेर-नगर मतदार संघातील १४ गावांना २२ कोटी ७७ लाख ६१ हजार रूपयांचा निधी मंजुर झाल्याची माहीती आमदार नीलेश लंके यांनी दिली. यापूर्वीही मतदार संघातील काही गावांना या योजने अंतर्गत निधी मंजुर झाला होता. आणखी काही गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून त्या गावांनाही लवकरच निधी उपलब्ध होईल असे आ. लंके यांनी सांगितले.
विविध गावांच्या योजनांसाठी मंजुर करण्यात आलेला निधी पुढीलप्रमाणे :
सांगवी सुर्या १ कोटी ५४ लाख ६७ हजार, घाणेगांव ६३ लाख ५८ हजार, हंगे १ कोटी ८९ लाख ८० हजार, ढोकी १ कोटी ९९ लाख ७६ हजार, गुणोरे १ कोटी ९५ लाख ५५ हजार, गटेवाडी ८० लाख ४२ हजार, शेरीकासारे १ कोटी ४७ लाख ९१ हजार, रेनवडी १ कोटी २० लाख ७७ हजार, तिखोल १ कोटी ९९ लाख ३६ हजार, पिंपळनेर १ कोटी ९९ लाख ५१ हजार, जातेगांव १ कोटी ९४ लाख ६४ हजार, म्हसे खुर्द १ कोटी ७० लाख ४२ हजार, चास १ कोटी ९९ लाख ८० हजार, निंबळक १ कोटी ६१ लाख ४२ हजार
आ. लंके यांनी सांगितले की विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान विविध गावांमध्ये पाणी योजनांची दुरावस्था झाल्याने तेथील महिलांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. त्याच वेळी आपण महिला भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर सर्वेक्षण करण्यात येऊन ज्या गावांना पाणी योजनांची आवष्यकता आहे, त्या गावांच्या योजनांचे प्रस्ताव तयार करण्यात येऊन ग्रामिण पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्यात आले होते. त्यानंतर या योजनांचे पाणीपुरवठा विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात येऊन विविध गावांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वीही काही गावांना या योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला असून आणखी काही गावांच्या योजनांना तिसऱ्या टप्प्यात निधी उपलब्ध होणार आहे.
पारनेर शहराचा पाणीप्रश्न मार्गी लावण्याचाही आपण शब्द दिला होता. या योजनेचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर देण्यात आला असून लवकरच या महत्वाकांक्षी योजनेलाही मंजुरी मिळून पारनेरचा जिव्हाळयाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे लंके यांनी नमुद केले.