संगमनेरात बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त. उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची सर्वात मोठी कारवाई.

संगमनेर. प्रतिनिधी.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला संगमनेरात बनावट दारूचा मोठा कारखाना उध्वस्त करून अवैध मद्याचा मोठा साठा हस्तगत करण्यात संगमनेरच्या राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या पथकाला यश आले
दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. संगमनेर अकोले तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील सर्वात मोठी ही कारवाई असल्याने मद्य शौकिनांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे मॅकडॉल.रॉयल स्टॅग.रॉयल चॅलेंज. इम्पेरियल ब्ल्यू .आदी नामांकित कंपन्यांची बनावट बुचे मोठ्या प्रमाणात हस्तगत झाल्याने महाराष्ट्रातील रिकाम्या बाटल्यांमध्ये ही दारू बनावट बुचे लावून पॅक केली जात होती. स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन देशात जल्लोषात साजरा होत असताना संगमनेरच्या राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकांच्या पथकाने काल रविवारी रात्री संगमनेर पुणे महामार्गावर गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दोन संशयित इसमांवर पाळत ठेवून बनावट मद्याचा मोठा साठा हस्तगत केला आहे
. रायतेवाडी शिवारात एका धाब्याचे मागे शेतामध्ये असलेल्या एका घरामध्ये गोवा व दमण राज्यातून आणलेले तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले विदेशी मद्य महाराष्ट्र राज्याच्या लेबल असलेल्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरले जात होते. तसेच या बाटल्यांवर नामांकित कंपन्यांची बुचे बसवली जात होती. महाराष्ट्रातील बाटल्यांवर लावण्यासाठी आणलेले विविध ब्रँडचे बनावट नकली बुचे व गोवा आणि दमनच्या दारूच्या पॅक बाटल्या तसेच एक हुंडाई कंपनीचे वाहन क्रमांक एम एस 17 सीएम 42 68 असा एकूण 9 लाख 28 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
यातील मुख्य आरोपी सुरेश मनोज कुमार कालडा. वय 22 राहणार जाणता राजा मैदानाजवळ संगमनेर. तसेच चैतन्य सुभाष मंडलिक वय 26 राहणार रायतेवाडी. या दोघांना मुद्देमाला सह ताब्यात घेण्यात आले आहे.राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय आयुक्त श्री.अनिल चासकर.पुणे विभाग व अहमदनगरचे अधिक्षक श्री.गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई संगमनेर विभागाचे निरीक्षक श्री.आर डी.वाजे.दुय्यम निरीक्षक श्री.व्ही.जी.सूर्यवंशी तसेच श्री.एम.डी.कोंडे साहेब.सहा.दुय्यम निरीक्षक एस.आर.वाघ. जवान एच.डी गुंजाळ श्रीमती एस.आर.वराट तसेच निरीक्षक अनिल पाटील.जमादार बी.ई.भोर. आदींनी कारवाईत सहभाग घेऊन सदरचा बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त करून बनावट मद्याचा मोठा साठा जप्त केला असून आरोपींना अटक करून त्यांच्याकडे पुढील चौकशी सुरू असून बनावट मद्याचा मोठा कारखाना संगमनेरात सापडल्याने संगमनेर अकोले तालुक्यातील मदय शौकिनांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सदरची बनावट मद्य संगमनेर व अकोले तालुक्यात विकले जात होते.अशीही माहिती समोर आली आहे .त्यामुळे संगमनेर अकोले तालुक्यातील मद्य शौकिनांमध्ये मोठी धास्ती पसरली असून घबराट निर्माण झाली आहे.यापूर्वीही 30 मार्च 2022 रोजी अकोले शहरातील बालाजी वाईन्स या वाईन शॉप मधून बनावट मद्याचा मोठा साठा संगमनेर विभागातील राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केला होता. सदरच्या कारवाईमुळे बालाजी वाईन्सचा परवाना ही कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला असून त्याच परिसरात असलेल्या एका अधिकृत लायसन्स धारकाच्या मुलाला तसेच संगमनेर पुणे महामार्गावरील एका लायसन्सधारकाच्या मुलाला कालचे बनावट मदयाचे प्रकरणात ताब्यात घेतल्यामुळे बनावट दारूचे पाळेमुळे शोधून काढण्यात राज्य उत्पादन संगमनेरच्या पथकाला यश आले आहे.
अशा प्रकारचे अवैध बनावट मदयामुळे नागरिकांच्या जीवास धोका पोहोचत असल्याने संगमनेरच्या कर्तव्यदक्ष उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असल्याचे बोलले जात आहे. तसेच नागरिकांनी खात्री करूनच अधिकृत परवानाधारक कक्षांमधूनच मद्य विकत घ्यावे. स्वस्त मिळते म्हणून कुठूनही बेकायदा विक्रेत्यांकडून मद्य विकत घेऊ नये.असे आव्हान संगमनेर विभागाचे निरीक्षक आर.डी.वाजे. दुय्यम निरीक्षक व्ही.जी.सूर्यवंशी व एम.डी.कोंडे यांनी केले आहे.
