ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र लक्ष्मणराव शिंदे यांच्या या पुस्तकाचे दिल्ली येथे होणार प्रकाशन!

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र व दिल्ली राज्यसभा सचिवालयाचे सेवानिवृत्त संयुक्त सचिव लक्ष्मणराव शिंदे यांनी ‘भारतीय संसदेची कार्यपद्धती’ हे पुस्तक राज्यशास्त्र आणि स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे.
ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र व दिल्ली राज्यसभा सचिवालयाचे सेवानिवृत्त संयुक्त सचिव लक्ष्मणराव शिंदे यांच्या दुसऱ्या पुस्तकाचे दिल्ली येथे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लवकरच प्रकाशन होणार आहे.
मागील वर्षी ‘भारतीय लोकशाहीचा इतिहास : भ्रम आणि वास्तव – वैदिक काळापासून वर्तमान काळापर्यंत हे पुस्तक प्रकाशित केले होते.परंतु त्यावेळी कोरोना महामारीने भारतात थैमान घातले होते.त्यामुळे या पुस्तकाचे विमोचन होऊ शकले नाही.आता लेखक दोन्ही पुस्तकांचे लोकार्पण दिल्ली येथे करणार असून दोन्ही पुस्तकांची प्रकाशन संस्था डायमंड, पुणे ही आहे.त्यांना पहिल्या पुस्तकाच्या लेखनासाठी पाच वर्षे तर दुसऱ्या पुस्तकास एक वर्ष लागले.दोन्ही पुस्तकांची मांडणी अतिशय अभ्यासपूर्ण असून अशाप्रकारच्या पुस्तकांची यापूर्वी कोणीही लेखन केलेले नाही.ही दोन्ही पुस्तके हिंदी,इंग्रजी व अन्य भाषेत भाषांतरित होणार असल्याचे लेखक शिंदे यांनी सांगितले.

लक्ष्मणराव शिंदे हे १९८२ मध्ये मुंबई विद्यापीठात पीएचडी करत असताना त्याचवेळी त्यांना भारतीय संसदेचे ‘राजपत्रित अधिकारी’ म्हणून नियुक्त केले गेले.त्यानंतर त्यांनी लंडन येथील ‘रिपा इंटरनॅशनल’ या संस्थेमध्ये ‘पार्लमेंट्री एडमिनिस्ट्रेशन’चे प्रशिक्षण पूर्ण केले आणि ब्रिटिश पार्लमेंटच्या हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्डच्या कार्यपद्धतीचे अध्ययन केले.शिंदे यांनी जवळ-जवळ ३३ वर्षे संसदेत अनेक पदांवर कार्यरत राहून त्यानंतर ते संयुक्त सचिव म्हणून सेवानिवृत्त झाले.
या पुस्तकात लेखकाने स्पष्ट केले आहे की संसदेचे कार्य नवीन कायदे बनविणे,वर्तमान काळामध्ये संशोधन करणे किंवा रद्द करणे हे आहेत.संसद अधिवेशन काळात विरोधी पक्षाचे सदस्य कोणते मुद्दे उठवू शकतात त्याचबरोबर प्रश्नकाळ आणि शून्यकाळामध्ये कोणते मुद्दे उठवले जाऊ शकतात,संसदेत कायदा बनविण्यासाठी प्रक्रिया काय असते,समित्यांचे कार्य काय असते,लोकसभा आणि राज्यसभा सचिवालय काय कार्य करते याचा आढावा घेतला आहे.तसेच संसद परिसराची विस्तृत माहिती दिली आहे. याव्यतिरिक्त संसद आणि सामान्य नागरिक यांच्यात संवाद कसा साधला जाईल याची माहिती आहे.एकूणच संसद ही भारतीय सर्वोच्च वैधानिक संस्था आहे.त्यासाठी कोणत्या व्यवस्थेचा वापर केला जातो यांचा आढावा लेखकाने या पुस्तकात घेतला आहे.