उद्योजक मधुकर ब्राह्मणकर यांचे कार्य समाजासाठी प्रेरक – महेश कोहोक

संतोष साबळे लिखित ‘दीपस्तंभ’ पुस्तकाचे प्रकाशन
नाशिक : कर्तृत्त्ववान माणसांच्या आयुष्यातील घटना, प्रसंग, आव्हाने आणि या सर्व गोष्टींपासून आयुष्यात मिळत जाणारे नीतीमुल्यांचे धडे समाजासाठी नेहमीच प्रेरक असतात. शहरातील प्रख्यात उद्योजक मधुकर ब्राह्मणकर यांच्या जीवनातील खडतर वाटचालीवर प्रकाश टाकणारे ‘दीपस्तंभ’ हे पुस्तकदेखील अनेकांच्य आयुष्यासाठी आदर्शवत ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योग समन्वयक महेश कोहोक यांनी केले.
‘दीपस्तंभ’ या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन गीता लॉन्स येथे अलिकडेच मोठ्या थाटात पार पडले. या कार्यक्रमास नाशिक औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, सन्मित्र मंडळ, दिव्य चेतना फाऊंडेशनचे पदाधिकारी तसेच अनेक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, आप्तेष्ट हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कळवण येथे सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मधुकर ब्राह्मणकर यांनी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अडचणींचा सामना केला. त्यांनी जीवनातील उच्च ध्येय कसे साध्य केले यावर प्रकाश टाकणारे दीपस्तंभ हे पुस्तक उद्योग क्षेत्रात नव्याने येवू पाहणाऱ्या युवकांना प्रेरणा देणारे आहे, असे मनोगत यावेळी पुस्तकाचे लेखक संतोष साबळे यांनी व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना मधुकर ब्राह्मणकर म्हणाले की, सामान्य माणसांच्या हातूनदेखील जगात आजवर जगात अनेक महान कार्य उभी राहीली आहेत. या सर्व माणसांसाठी प्रत्येकवेळी परिस्थिती अनुकूल होतीच असे नाही. तरीही त्यांनी मोठी स्वप्न पाहिली आणि ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. अशा कर्तृत्त्ववान माणसांची जीवनचरित्र इतरांच्या आयुष्यासाठी दीपस्तंभ असतात. अशा अनेक जीवनचरित्रांनी माझ्यात आत्मविश्वास भरला. या आत्मविश्वासाच्या भांडवलावरच आयुष्यात भव्य पण इतरांच्या उपयोगी पडणारे काहीतरी उभारावे, असे स्वप्न मी बघितले होते. जन्मत:च कुटुंबाची पार्श्वभूमी सामान्य परिस्थितीमधील असल्याने परिस्थिती आयुष्यात अनुकूल होईल अन् नंतर आपण कर्तृत्त्वाचा टेंभा मिरवू, याची वाट आपण कधीही पाहिली नाही. लहानपणापासून मनावर झालेले संस्कार असतील किंवा कितीदाही मोडून पडलो तरीही, पुन्हा उभे राहण्याची जिद्ददेखील वाडवडिलांपासून माझ्यापर्यंत वाहत आली.
आजवरच्या आयुष्याच्या दीर्घ वाटचालीमध्ये पुणे अनाथ विद्यार्थी गृहात मला मिळालेले संस्कार, हा माझ्याजवळचा अमूल्य ठेवा आहे. या वास्तूतील निवासकाळात मला लाभलेला मित्रपरिवार, सहकार्याची वृत्ती माझ्या अंगी बाणवून गेला. याशिवाय श्रमदान आणि स्वावलंबनाच्या संस्काराने माझ्या आयुष्याचा पुढील पथही समृध्द केला. गरिबी कशाला म्हणतात हे मी जवळून पाहिले आहे. परिस्थितीची दाहकता अत्यंत जवळून अनुभवली आहे. त्यामुळे पुढील काळात लाभलेल्या ऐश्वर्याच्या परिघात अडकून राहण्याचा मोह मी कायमच टाळत आलो. आपल्याला लाभलेल्या दोन गोष्टींचा उपयोग गरजूंसाठी व्हावा. कळवणसारख्या ग्रामीण-दुर्गम भागातून सुरू झालेला एका युवकाचा प्रवास आज जगातील ३० पेक्षा अधिक देशांमध्ये उत्पादने निर्यात करण्यापर्यंत पोहोचण्यासाठी पत्नी मालती ब्राह्मणकर यांच्यासह आजवर ज्या म्हणून घटकांचे, ज्ञात-अज्ञात हितचिंतक आणि पाठीराख्यांचे पाठबळ मला लाभले आहे, त्यांचे ऋण आयुष्यभर माझ्यावर राहतील. व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवताना एक स्वप्न होते की, देशातील सर्वात मोठी आंतरदेशीय उत्पादक कंपनी आपली असावी. हे ध्येय साध्य झाल्याचे आज समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी शेखर ब्राह्मणकर आणि वृषाली ब्राह्मणकर यांनी स्वागत केले. शाम पाडेकर या यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हर्षद आणि निधी ब्राह्मणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.