भायगावचे माजी सरपंच किसनराव लांडे यांचे निधन

शहराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव- नेवासा राजमार्गा लगत असणाऱ्या भायगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावंत व लोकनेते मारुतराव घुले पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी भायगावचे माजी सरपंच स्वर्गीय किसनराव हरिभाऊ लांडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
गावातील लहान पोरांसह अबाल वृद्धापर्यंत, मित्र परिवार व नातेवाईकांमध्ये हसतमुखाने बोलणारे व अत्यंत मनमिळावू जे मनात तेच वागण्यात असे तत्व सांभाळणारे धार्मिक विचारसरणीचे लांडे यांचे निधन भायगावकरांना खऱ्या अर्थाने दुःख देऊन गेले. त्यांनी अनेक वर्ष भायगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून राजकारण न करता समाजकार्याला महत्त्व देऊन काम केले. गावातील कोणत्याही जाती धर्माच्या लोकांच्या सुखदुःख मध्ये नेहमी अग्रेसर लांडे कुटुंबातील ते एक सदस्य होते. स्वर्गीय सावळेराम पाटील लांडे यांच्या समाजकार्याचा वसा स्वर्गीय किसनराव लांडे यांनी आपले स्वच्छंदी जीवन जगत असतानाही आयुष्यभर जपला.
त्यांच्या सरपंच पदाच्या काळात गावात अनेक विकासात्मक कामे त्यांनी केली. रस्ते, पाणी, शेतीला पूरक ठरणारे बंधारे, याबरोबरच त्यांनी भव्य असे ग्रामपंचायत कार्यालय उभारले आज ते जरी तुमच्या आमच्या सहवासात नसले. तरी त्यांनी गावासाठी समाजकारण म्हणून केलेले काम निश्चितच सर्वांच्या स्मरणात राहील. मृत्यूसमयी ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, भाऊजया, तीन बहिणी, दोन मुले, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भायगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष अँड. लक्ष्मणराव हरिभाऊ लांडे यांचे ते बंधू होते. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक २६/०८/२०२२ रोजी प्रवरासंगम येथील रामेश्वर मंदिराच्या गोदाकाठी होणार आहे. विधीनिमित्त ह. भ. प. गहिनीनाथ महाराज आढाव यांचे कीर्तन होईल.