नाशिक रोटरी क्लबचा ४० पुरस्कारांनी सन्मान

डिस्ट्रिक्ट ३०३०च्या ‘जीवन गौरव’ सोहळ्यात झाले वितरण
नाशिक : गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याऱ्या रोटरी क्लब ऑफ नाशिक या संस्थेचे मागील वर्षातील कार्यही विशेष वाखण्याजोगे ठरले. डॉ. श्रीया कुलकर्णी अध्यक्ष राहिलेल्या रोटरी क्लब ऑफ नाशिक या क्लबचा डिस्ट्रिक्ट ३०३० च्या वार्षिक ‘जीवन गौरव पुरस्कार’ सोहळ्यात विविध क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तब्बल ४० पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
रोटरी क्लबच्या डिस्ट्रिक्ट ३०३० चा वार्षिक ‘जीवन गौरव पुरस्कार’ सोहळा येथील मनोहर गार्डनमध्ये नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. डिस्ट्रिक्ट ३०३० चे माजी प्रांतपाल रमेश मेहेर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अतिशय रंगतदार आणि दिमाखदार कार्यक्रमात रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० मधील एकूण ९६ क्लबमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या क्लबचा सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉ. श्रीया कुलकर्णी यांच्या २०२१- २२ या वर्षातील कामासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकने सर्वाधिक सन्मान पटकावले आहेत. त्यात विशेषतः कोहिनूर प्रेसिडेंट अवॉर्ड बरोबरच सर्वोत्कृष्ट महिला सदस्य, जनसंपर्क, मासिक, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम, ग्रामविकास, पर्यावरण संवर्धन, आदिवासी भागातील गरजूंना धूर विरहित चुलींचे केलेले वाटप, याशिवाय मूल्यशिक्षण, नेतृत्वगुण विकसन, कृषी व जलसंधारण, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तब्बल ४० पुरस्कार पटकावित मागील सर्व पुरस्कारांचे रेकॉर्ड तोडून आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. मंगेश अपशंकर यांचाही डिस्ट्रिक्टमधील सर्वोत्कृष्ट क्लब सचिव म्हणून सन्मान करण्यात आला.
यावेळी अनेक रोटरी पदाधिकारी आणि सदस्यांचाही विविध पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. रोटरीचे विद्यमान अध्यक्ष सीए प्रफुल बरडिया, सचिव ओमप्रकाश रावत यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमास नाशिक शहरातील अनेक मान्यवर तसेच रोटरीचे पदाधिकारी आणि सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल डॉ. श्रीया कुलकर्णी आणि नाशिक रोटरी क्लबचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.