कुठलीही तक्रार न करता प्रतिकूलतेवर मात करत अविरत संघर्ष केला तरच यश आणि प्रगतीची दारे खुली होतात – ज्योती भादेकर

महिलाश्रम वसतिगृहात भरारी 2025 होस्टेल डे उत्साहात
पुणे – कुठलीही तक्रार करत न बसता प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी अविरत संघर्ष केला तरच यश आणि प्रगतीची दारे खुली होतात असे इंटरनॅशनल पावर लिफ्टर ज्योती महेश भादेकर यांनी सांगितले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहातील भरारी 2025 या होस्टेल डे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेष म्हणजे भादेकर या वसतिगृहाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. ज्या वसतिगृहाने आपल्याला घडवले त्याच वसतिगृहात आता प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेच्या संचालक सीमा कांबळे अध्यक्षस्थानी होत्या.
वैयक्तिक आयुष्यात शारीरिक व्याधींमुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर कसे गाठले याची अतिशय प्रेरणादायी माहिती त्यांनी विद्यार्थिनींना दिली.
वसतिगृहातील केस वर्कर कुमुदिनी पाठक यांनी त्यांचा परिचय करून दिला. वसतिगृहाच्या उपप्रमुख पूनम पोटफोडे यांनी प्रास्ताविकात वसतिगृहातील उपक्रमा माहिती दिली.
वसतिगृहात चालणाऱ्या उपक्रमांना सेवाभावी वृत्तीने मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा व हितचिंतकांचा तसेच वसतिगृहात विविध उपक्रमांना मदत करणाऱ्या विद्यार्थिनी तसेच विशेष राज्यस्तरीय बक्षिसे मिळवलेल्या वसतिगृहातील विद्यार्थिनींचा कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या संस्था व व्यक्तींचा परिचय केस वर्कर कांचन फाळके यांनी करून दिला.

वसतिगृहात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचारी चंद्रभागा राठोड, द्वारका बवले, स्वयंपाक घर मदतनीस सुनीता धुमाळ यांचा सत्कार मा. सिमाताई कांबळे यांच्या हस्ते वत्सल स्मृती पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
मणीलक्ष्मी सिडगिद्दी, स्वरा भोसेकर, प्रतीक्षा हरिहर, दिव्या सावळे,साक्षी गव्हाणे, यांनी वसतिगृहातील अनुभव सांगितले. सूत्रसंचालन कुमारी सृष्टी झेंडे कुमारी सानिया साळवे यांनी केले.
या कार्यक्रमाला वसतिगृह प्रमुख सुमन तांबे /यादव, सर्व मेट्रन्स सेवक वर्ग व विद्यार्थिनी उपस्थित होते.
श्रीमती रुक्मिणी बागुल यांनी आभार मानले. वसतिगृहातील विद्यार्थिनींनी भारतीय संस्कृतीवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शेवटी आश्रमगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.