इतर
अकोले तालुक्यातील गणपती स्थाने .

पुरातन देवस्थानांची अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याला विपूल अन् वैविध्यपूर्ण वेधक परंपरा आहे . गणपती देवस्थानेही अपवाद नाहीत . तालुक्यातील वीरगाव , कोतूळ आणि अकोले गांव या तीन निवडक गणेश स्थानांचा मागोवा प्रस्तुत विवेचनात घेतलाय .
अकोल्याच्या उत्तरेकडील देवठाण रोडवरील वीरगाव या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गांवात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कालीन एक आकर्षक बारव आहे . या बारवेचे बांधकाम अहिल्याबाईंनी केले आहे . या बारवेतील दगडी भिंतीच्या कोनाड्यात गणपतीची सुरेख आकर्षक गणपती मूर्ती देखील अहिल्याबाई यांच्याच हस्ते तेंव्हा बसविण्यात आल्याची माहिती मिळते . श्री अस्वले यांच्या शेतात असलेल्या या बारवेला ४७ पायऱ्या आहेत . वळणदार सोंड , आकर्षक हात - पाय अन् डोळे कोरलेली गणपती मूर्ती लक्षणीय आहे .
पेशवाईतील गाजलेल्या साडेतीन शहाण्यांपैकी विठ्ठल सुंदर परशरामी यांच्या कोतूळ गावालाही इतिहास , निसर्ग अन् उद्योग व्यवसाय बाजारपेठेचा कधीकाळी समृद्ध वारसा राहिला ! याच कोतूळ गावातील कोतूळेश्वर हे शिवालय विख्यात . या गावातील वरच्या गल्लीत वरदविनायक गणपती हे गणेश स्थानही वेधक आहे . बैठी मूर्ती असलेल्या गणपतीची आकर्षक सोंड आणि हातातील शस्त्र नजरेस पडते . गणेशोत्सवाच्या मुख्य कालावधीसह वर्षभरातील चतुर्थी तिथी आणि अन्य महत्त्वाच्या सणसमारंभ काळात स्तोत्र पठणासह पूजाविधी होत असतात .
अकोले येथील महर्षि अगस्ति आश्रम देवस्थान आणि सिद्धेश्वर - गंगाधरेश्वर ही विख्यात देवस्थाने . गणपती स्थाने गावात विपूल आहेत . मधली गल्ली या नावाने परिचित सुभाष रोडवरील विख्यात दत्त भाविक संत संतकवी दत्तवरद विठ्ठल यांनी स्थापन केलेल्या प्रमुख दत्त मंदिरात एक आकर्षक सुरेख गणपती मूर्ती विराजमान आहे . विशाल कर्ण ठेवण , दोन्ही हाती असलेली शस्त्र रचना हे या मूर्तीचे वैशिष्ट्य .

तालुक्यातील गणपती देवस्थाने वैविध्यपूर्ण – वैशिष्ट्यपूर्ण अन् विपूल असली तरी प्रातिनिधिक स्वरूपात याठिकाणी कोतूळ , वीरगाव आणि अकोले येथील निवडक स्वरूपात परामर्श घेतला आहे . माउली संत ज्ञानदेवांनी वर्णिलेला – ‘ वेदप्रतिपाद्य , स्वसंवेद्य , आद्य – आत्मरुप ‘ असा श्री गणपती !
अकोले तालुक्यातील प्रातिनिधिक रुपात वर्णिलेली श्रीं ची ही ‘ रुप – स्थाने ‘ पुरेशी ठरेल ही अपेक्षा .. 🍁🙏🏻
———-…..———……..—————
डॉ . सुनील शिंदे :
अकोले