मुख्यमंत्री गावी गेल्याने मंत्रालयात शुकशुकाट!

🔹मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवस मुंबईबाहेर गेल्याने मंत्रालयात सध्या शुकशुकाट आहे. आश्चर्य म्हणजे सध्या प्रशासकीय बदल्यांचा काळ असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीसाठी मंत्रालय ते महाबळेश्वर असा मंत्रालयातील फायलींचा प्रवास करविण्यात आल्याचेही समोर येत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी घरूनच तब्बल 65 फायलींचा निपटारा केल्याचीही माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील “दरे’ या त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. चार दिवस ते गावी सहकुटुंब मुक्कामाला असणार आहेत. त्यांच्या गावी यात्रा आहे, असे कारण त्यांच्या कार्यालयातील सूत्रांनी दिले. मात्र अचानक मुख्यमंत्री गावी गेल्याने मुंबईत चर्चांना उधाण आले आहे. सध्या प्रशासकीय बदल्यांचा कालावधी आहे.
आपल्या पसंतीच्या ठिकाणी बदल्या होण्यासाठी अधिकारी मंत्रालयात येत आहेत. मुख्यमंत्री गावी गेल्याने त्यांच्या सहीसाठी मुख्यमंत्री कार्यालयातील फायली सध्या रोज साताऱ्यास पाठवल्या जात आहेत.
शिंदे हे सोमवारपासून कोयना जलाशयाच्या पलीकडे असलेल्या आपल्या गावी आहेत. या वेळी त्यांनी आपल्या मालकीच्या शेतीची पाहणीही केली व मंगळवारी ते ग्रामदेवता श्री जननी देवी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमालाही उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सध्या दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. त्यानंतर ते नागपूरला एक दिवस जाणार असून त्यापुढचे दोन दिवस ते मॉरिशसला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे फडणवीस सलग 5 दिवस मुंबईबाहेर असणार आहेत. त्यामुळे आठवडाभर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आऊट स्टेशन असल्याने त्यांच्या कार्यालयात शुकशुकाट पहायला मिळत आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानेच विश्रांती : केसरकर
यासंदर्भात शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री नाराज असल्याने ते गावी गेले असल्याच्या या चर्चांमध्ये तथ्य नाही. मुख्यमंत्र्यांना डॉक्टरांनी सध्या सक्तीची विश्रांती सांगितली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना चार दिवस गावी नेले आहे.