इतर

पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे नुकसानीचे पिकांचे त्वरीत पंचनामे करा : सरपंच प्रकाश गाजरे

पारनेर प्रतिनिधी

गुरुवारी रात्री पारनेर तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील पोखरी, देसवडे, मांडवे खु., खडकवाडी, म्हसोबा झाप, कामटवाडी, वारणवाडी, कातळवेढा, पळसपुर, नांदूर पठार, पिंपळगाव रोठा, कारेगाव, कासारे, सावरगाव, टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, वासुंदे, वडगाव सावताळ, तिखोल काकनेवाडी या ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे परिसरातील तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पावासाने शेतकरी वर्गामध्ये एकीकडे समाधानाचे वातावरण असताना मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. पाऊस अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अधिकाऱ्यांनी शेती पिकाची पाहणी करून पीक पंचनामा करावा अशी मागणी म्हसोबा झाप चे सरपंच प्रकाश गाजरे यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके व तहसीलदार निवेदन देऊन केली आहे.

  पारनेर तालुक्याच्या उत्तर भागांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सध्या काढणीला आलेली बाजरीचे पीक हे जमीनदोस्त झाले आहे. तसेच वाटाणा, मिरची, टोमॅटो, सोयाबीन, कांदा, कोबी, फ्लावर या पिकांचेही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. तातडीने या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत तसेच म्हसोबा झाप येथील शेतकरी संतोष हांडे यांच्या घराची सुद्धा या पावसामुळे पडझड मोठ्या प्रमाणात झाली आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु सतत मुसळधार पाऊस असल्यामुळे जे पीक शेतामध्ये आहे त्याचेही आता नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी व महसूल विभागाने तातडीने या सर्व नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे शेतकरी नेते किरण वाबळे यांनी केली आहे. 


:

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button