बाप्पाला निरोप देण्यासाठी संगमनेरात प्रशासन सज्ज!

संजय साबळे /संगमनेर प्रतिनिधी
श्री गणेश विसर्जनासाठी नगर परिषदेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून प्रशासन सुसज्ज असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली आहे.
कोरोना साथ रोगाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर यावर्षी सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात असून अनंत चतुर्दशीच्या दिवशी या उत्सवाची सांगता होत आहे. त्या दृष्टीने नगरपरिषदेने जय्यत तयारी केली आहे
.या अंतर्गत गणेश मूर्तींचे विसर्जन करणे कामी शहरातील जाणता राजा मैदान , रणजीत स्पोर्ट्स क्लब मैदान शनी मंदिराजवळ, पोफळे मळा अकोले बायपास रोड या ठिकाणी कृत्रिम हौद करण्यात येणार आहे. तसेच श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करणे करिता आलेल्या गणेश मूर्ती व निर्माल्याचे संकलन करण्यासाठी शहरातील चंद्रशेखर चौक साटम मठाजवळ , अकोले रोड शारदा विद्यालयाजवळ, गणेश नगर गणेश गार्डन ,बी एड कॉलेज जवळ, इंदिरानगर, शिवाजीनगर आशीर्वाद पतसंस्थे जवळ तसेच भूमी अभिलेख कार्यालयाजवळ श्री गणेश मूर्ती व निर्माल्य संकलन करण्यासाठी संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे .
तसेच महाळुंगी नदीला पाणी असल्यामुळे मानाच्या गणेश मंडळांसह घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन विजय घाट व गंगामाई घाट याच ठिकाणी होणार आहे . कोणतीही अनुचित दुर्घटना घडू नये व गणेश विसर्जन शांततेत व्हावे यासाठी गंगामाई घाट ते महादेव घाट तसेच शांतीघाट , अमरधाम जवळील परिसरात गणेश विसर्जन होणार नाही याची सर्वांनी नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक डॉ.शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम , उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने ,मुख्याधिकारी राहुल वाघ , पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले , उपमुख्याधिकारी सुनील गोरडे व कार्यालय निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी केले आहे.