नव्या वर्षात “सावित्री उत्सव” घरोघरी साजरा करा श्री संत सावता माळी युवक संघाचे आवाहन

आळेफाटा /प्रतिनिधी:
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारीला असून जातीपातीधर्माच्या पलिकडे जाऊन समाजात माणूसपण टिकवण्यासाठीची एकजूट म्हणून नवीन वर्षातला पहिला उत्सव “सावित्री उत्सव” घरोघरी जयंतीच्या औपचारिकतेची मरगळ झटकून विचारांचा उत्सव म्हणून रुजवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल महाराज गडगे यांनी केले आहे.
ज्या काळात भारतीय समाज जातीभेदाची रुढी परंपराची बंधनं पाळत होता, स्त्री शिक्षणाला विरोध करत होता, समाजसुधारणेच्या वाटेवर चालणाऱ्यांना वाळीत टाकलं जाण्याचा धोका होता, अशा काळात सावित्रीबाई जोतिबांच्या खांद्याला खांदा लावून नुसत्या उभ्या राहिल्या नाहीत, तर त्यांनी स्वतंत्रपणे समाजाचं नेतृत्व केलं. जोतिबांच्या निधनानंतरही त्यांनी सामाजिक कार्याची धुरा सक्षमपणे वाहिली. आजची स्त्री सक्षमीकरणाची पाऊलवाट तयार झाली, ती सावित्रीबाईंमुळेच ; हे समाजात ठळकपणे रुजणं गरजेचं आहे.
आजच्या कोविड संकटकाळात सर्व तऱ्हेची खबरदारी घेऊन लोक कार्यरत आहेत ; पण ज्या काळात सुरक्षिततेची साधनं नव्हती, त्या काळात सावित्रीबाई पाठीवर प्लेगचा रुग्ण घेऊन खऱ्याखुऱ्या योद्धा बनून दवाखान्यात धावल्या होत्या. दीडशे वर्षं उलटली… पण, त्यावेळचे शिक्षणाचे, आरोग्याचे, सुविधांचे, स्त्रीपुरूष विषमतेचे, जातीयतेचे, धर्मांधतेचे विषय आजही आ वासून उभे आहेत. किंबहुना, ते दिवसेंदिवस भेसूर होत चाललेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. ती सामाजिक उत्सवाच्या माध्यमातून होऊ शकते. आपल्या घरापासूनच सावित्री उत्सवाच्या आयोजनाची सुरुवात आपल्याला करायची आहे असे गडगे म्हणाले.
घरातल्या सर्व सदस्यांनी मिळून घर सजवावं, रंगवावं, विविध कल्पकतेने नटवावं, सामाजिक संदेश लिहावेत, रोषणाई करावी, दारात कंदील लावावा, पणती लावावी, रांगोळी काढावी, दाराला तोरण बांधावं, घरात गोडधोड करावं, शेजारीपाजारी यांनाही द्यावं आणि कोणी विचारलं तर गर्वाने सांगावं, आज काय आहे, तर सावित्री उत्सव आहे !
वक्तृत्व, सामाजिक संदेशांचं सुलेखन, एकांकिका, एकपात्री, निबंध, काव्य लेखन, गायन, ज्योतिबा सावित्री तसंच इतर समाजसुधारकांच्या प्रबोधनात्मक विचारांचं अभिवाचन असे कला साहित्याला वाहिलेले अभिव्यक्तीचे विविध उपक्रम, गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार, प्रभातफेरी, समूहगान, पोस्टर स्पर्धा, शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा शिक्षणात आणण्यासाठी प्रयत्न करावा, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यवाटप, ऑनलाईन वेबिनारचं आयोजन, चर्चासत्र, रक्तदान शिबीर, संविधानाच्या उद्देश्यिकेचं सामुहिक वाचन, शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याचा आसूडसारख्या पुस्तकाचं अभिवाचन असे कित्येक उपक्रम करण्यासारखे आहेत.
मुलींनी, युवतींनी, स्त्रीयांनी कपाळावर चिरी लावून सोशल नेटवर्किंगमध्ये फोटो पोस्ट करावेत, प्रोफाईल फोटो ठेवावेत, सामाजिक संदेशांचे विडिओ पोस्ट करावेत.
एक प्रकारे हा दिवस केवळ एखाद्या समाजसुधारकाच्या जयंतीपुरता मर्यादित ठेवायचा नसून तो आता महाराष्ट्राचा, अवघ्या देशाचा सण व्हायला हवा, उत्सव व्हायला हवा. ही एक सामाजिक क्रांती ठरणार आहे. श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाच्या माध्यमातून राज्य, जिल्हा, तालुका, गाव पातळीवर छोट्या-मोठ्या प्रमाणात, ज्याला जसं शक्य होईल, कोविडचे नियम पाळत सार्वजनिक किंवा घरगुती स्तरावर सावित्रीउत्सव साजरा व्हायला हवा असे आवाहन विशाल महाराज गडगे यांनी केले आहे.