पुणेकर हिंदू देवतांचा अपमान खपवून घेणार नाहीत : सुनील देवधर

>
पुणे : समस्त हिंदुस्थानाचे गर्वस्थान असलेल्या प्रभू श्रीराम आणि माता सीता मातेचा कसलाही अपमान पुणेकर हिंदू समाज खपवून घेणार नाही, असा प्रयत्न करणाऱ्या मानसिकतेला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी दिला. रविवारी (४ फेब्रुवारी.) लेडी रमाबाई हॉल, स.प. विद्यालय येथे श्रीशिवसमर्थ सेवा प्रकाशन व राष्ट्रवीर संघ या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महाराणा प्रताप यांच्यावरील डॉ. ओमेन्द्र रत्नू लिखित ‘महाराणा: एक सहस्त्र वर्षाचं धर्मयुद्ध…’ या ग्रंथाच्या अनुवादित महाराणा
या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ लेखक चारुचंद्र उपासनी या ग्रंथाचा अनुवाद केला आहे.
‘आधी एफटीटीआय आणि आता पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात जाणून बुजून हिंदू समाजाच्या आराध्यांचा अपमान करण्याचा खेळ काही हिंदू विरोधी प्रवृत्तींकडून खेळला जात आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये त्यातही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने चालणाऱ्या विद्यापीठामध्ये असे प्रसंग घडणे, ही पुणे शहरासाठी अत्यंत लाजिरवाणी तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर शहराची प्रतिमा मलीन करणारी घटना आहे. विद्यापीठ व पोलीस प्रशासनाने अशा प्रवृत्तींवर लवकरात लवकर आळा घालावा, अन्यथा पुणेकर हिंदू समाज अशा प्रवृत्तींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी समर्थ आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
स्वातंत्र्योत्तर काळात जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्य भारतासंबंधी जे प्रश्न निर्माण झाले ते तत्कालीन पंतप्रधान नेहरूंमुळे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही प्रश्नांवर सर्वमान्य उपाय शोधला असल्याचे ते म्हणाले. नेहरू हे आपल्या देशावरील सर्वांत मोठा अभिशाप होता अशी टिप्पणी देखील देवधर यांनी यावेळी केली.
हिंदू समाजाने वेळेवर जागे होऊन आपला धर्म आणि राष्ट्राच्या संरक्षणासाठी तसेच पाकिस्तानातील आपल्या हिंदू बांधवांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आपण सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन पुस्तकाचे लेखक डॉ. ओमेन्द्र रत्नू यांनी यावेळी बोलताना केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी समाजात आत्मबोध आणि शत्रुबोध हा खूप आवश्यक आहे. आपल्या समाजातील ऐक्य अधिक सक्षम करण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखवली.
अनुवादक चारूचंद्र उपासनी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रत्नू यांच्या पुस्तकाची व त्याची मराठीतील अनुवादाची आवश्यकता मांडली. तसेच आपला हा ऐतिहासिक वारसा पुढील पिढीकडे देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची आवश्यकता मांडली. त्याआधी राष्ट्रवीर संघाच्या स्वयंसेवकांनी विविध पारंपरिक व साहसाचे खेळ सादर केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तृप्ती वीरकर यांनी केले तर आभार गीता उपासनी यांनी मानले.
..