पारनेरचे सुनील गायकवाड ” उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न ” पुरस्काराने सन्मानित!

क्रीडा क्षेत्रात शेकडो खेळाडू घडविणाऱ्या क्रीडा शिक्षकाच्या कार्याला मिळाला न्याय !
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
धार्मिक,सामाजिक,शैक्षणिक,राजकीय,कला,क्रीडा,साहित्य क्षेत्रात महाराष्ट्रभर ज्या तालुक्याचे नाव नेहमी चर्चेत असते तो तालुका म्हणजे पारनेर तालुका.महाराष्ट्र स्तरावर आजवर पारनेर तालुक्यातील अनेक गुणवंत मान्यवरांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला असून विविध क्षेत्रात पारनेर तालुक्याचे नाव पोचविण्याचे काम केले त्यापैकीच क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व म्हणजे सुनील गायकवाड ( सर ).
गेली अनेक दशके पारनेर शहरात देशाला अनेक मान्यवर,हिरे देणारे विद्यालय म्हणजे अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे सेनापती बापट विद्यालय या विद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असणारे सुनिल गायकवाड यांनी देशाचे भविष्य असणारे ग्रामीण भागातील तरुणांना क्रीडा क्षेत्रात व्यासपीठ मिळाले पाहिजे.जिल्हा व राज्यस्तरावर ग्रामीण भागातील खेळाडू पोहोचला पाहिजे,तो निरोगी व सुदृढ झाला पाहिजे.महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वच खेळात माझा विद्यार्थी पोहोचला पाहिजे हा मानस ठेवत आपल्या शिक्षेकीसेवेत नोकरी म्हणून नव्हे तर क्रीडा प्रशिक्षक म्हणून पुर्णवेळ या विद्यालयात सेवा देत असताना आजवर शेकडो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे पारनेर येथे कार्यरत असलेले क्रीडा शिक्षक सुनील रघुनाथ गायकवाड यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ” उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे . त्यात उत्तर महाराष्ट्र पुरस्काराचे मानकरी श्री.सुनील गायकवाड हे ठरले असून रविवार दिनांक 25 जून रोजी नाशिक येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दादासाहेब भुसे व आंतरराष्ट्रीय ऑलिंपिकमध्ये नाविन्यपूर्ण यश मिळवलेल्या इतर मान्यवर खेळाडूंच्या हस्ते तसेच नाशिक येथील आयोजक पदाधिकारी व स्थानिक नेते मंडळींच्या उपस्थितीत हा पुरस्कार देत क्रीडा शिक्षक सुनील गायकवाड सर यांना सन्मानित करण्यात आले .
क्रीडा शिक्षक सुनील गायकवाड यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे प्रमुख कार्यवाह सन्मा. छायाताई फिरोदिया संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक,शाळा समिती सदस्य,पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी खेळाडू व
ग्रामस्थांनी सुनील गायकवाड यांच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. गायकवाड यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचा पारनेर शहर व विविध ठिकाणी अभिनंदन व सत्कार करण्यात येत आहे.