जवळ्यात धाडसी दरोडा… पाच लाखांचा ऐवज लंपास

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी:-
पारनेर तालुक्यातील जवळा येथे धाडसी दरोडा टाकत महिलांना मारहाण करत दागदागिने, रोख रकमेसह तीन लाख रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी, ६ एप्रिल (गुरुवार) रोजी पठारे वस्तीवर राहणारे सौ रंजना शहाजी पठारे व त्यांच्या सुनबाई आणि तीन वर्षाचा लहान मुलगा शेतीची दैनंदिन कामे उरकून जेवण करून नेहमीप्रमाणे झोपले होते. रात्री दीड वाजेच्या दरम्यान दहा ते बारा काळी कपडे, माकडटोप्या व हातमोजे परिधान केलेल्या अज्ञात चोरट्यांनी ग्रीलचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.
मोठा आवाज झाल्याने रंजनाबाई यांना जाग आली. प्रथमतः भांबावलेल्या अवस्थेत त्यांना काही सुचेना, इतके लोक कसे काय घरात आले समजेना. तेवढ्यात दरोडेखोरांनी मोबाईल काढून घेत महिलांच्या मानेला सुरा लावत गप्प बसण्यास सांगत जवळ जे काही असेल ते काढून द्या नाही तर खलास करून टाकू व तुमच्या बाळाला फेकुन देऊ असे म्हणत दमदाटी करून मारहाण करू लागले.
यावर रंजनाबाईनी तुम्हाला हवं ते न्या पण आमच्या बाळाला आम्हाला मारू नका म्हणत अंगावरचे सर्व सोने दागिने काढून दिले. त्यानंतर काही चोरट्यांनी आतल्या खोलीत प्रवेश करत कपाटांची तोडफोड करून उचका पाचक करत सुमारे दहा ते बारा तोळे सोने रोख रक्कम असा तीन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
घटनेची माहिती मिळताच नुकतेच पारनेरला रुजू झालेले पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड तातडीने घटनास्थळी आपल्या यंत्रणेसह दाखल झाले व परिस्थितीची पाहणी करत तपसाच्या दृष्टीने जलद सूत्रे फिरवली. श्वान पथक, ठसेतज्ञ यांची मदत घेत पुढील तपास चालू केला आहे. हातमोजे, पायमोजे, माकडटोप्या घालून आलेले असल्याने ते सराईत दरोडेखोरअसावेत असा कयास निघत असून सदर घटनेचा तपास लावण्याचे व पारनेर तालुक्यातील चोऱ्या, दरोडे, गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.