रोटरी च्या शेतकरी बाजारास शेकडो नाशिककरांचा उदंड प्रतिसाद!

नाशिक /प्रतिनिधी
नाशिक शहरात लोकप्रिय असलेला रोटरी क्लब ऑफ नाशिक प्रणित रोटरी शेतकरी बाजार रविवारपासून नव्या स्वरूपात कॅनडा कॉर्नर येथील बीएसएनएलच्या आवारात ग्राहकांच्या भरघोस प्रतिसादाने सुरू झाला. रोटरीच्या या शेतकरी बाजारातून शेकडो नाशिककरांनी खरेदीचा आनंद घेतला.
एरवी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ नाशिकने नाशिककरांना स्वच्छ, ताजा आणि उच्च दर्जाची फळे,भाजीपाला योग्य आणि माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी वेगळा उपक्रम सुरु करण्याची संकल्पना मांडली. यातून ‘ऑरगॅनिक बाजार’ नावाने नाशिककरांच्या सेवेत दाखल झाले. हा बाजार गेली पाच वर्षे नाशिककरांच्या सेवेत आहे. आता या बाजाराचे स्वरूप बदलण्यात आले असून तो आता यापुढे शेतकरी बाजार नावाने ओळखला जाईल.

कॅनडा कॉर्नर येथील बीएसएनएलच्या आवारात शेतकरी बाजाराचे उदघाटन उद्यान पंडित डॉ. स्वप्नील बच्छाव यांच्या हस्ते आणि बीएसएनएलचे महाव्यवस्थापक नितीन महाजन यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. रोटरी क्लबने थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून भाजीपाला, फळे आणि धान्य ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. नाशिककरांना शेतकऱ्यांचा सेद्रिय पद्धतीने उत्पादित स्वच्छ, ताज्या पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्या, फळे, विदेशी भाज्या कमीतकमी हाताळणी करून ग्राहकांना उपलब्ध देण्यात आला होता. जैविक घटकांचा वापर करून हानिकारक रसायन विरहीत उत्पादित व प्रमाणित केलेल्या मालास ग्राहकांनी चांगली पसंती दिली. या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. हा बाजार दर रविवारी बीएसएनएलच्या कम्युनिटी हॉलमध्ये, बीएसएनएल कंपाऊंड येथे भरवला जाणार आहे. बाजार आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष सीए प्रफुल बरडिया, सचिव ओमप्रकाश रावत, कम्युनिटी सर्व्हिस संचालक हेमराज राजपूत, जैन एकता मंचच्या अध्यक्षा शिल्पा चोरडिया, इनरव्हीलच्या अध्यक्षा धारा मालुंजकर, जनसंपर्क संचालक संतोष साबळे, रोटरी बाजार समन्वयक रफिक वोरा, राज यादव, तुषार उगले, मंथ लीडर स्मिता अपशंकर, वृषाली ब्राह्मणकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी माजी अध्यक्ष अनिल सुकेणकर, दिलीप सिंग बेनीवाल, डॉ. श्रिया कुलकर्णी, मुग्धा लेले, मंगेश अपशंकर, सुधीर जोशी, सागर भदाणे, गौरव सामनेरकर डॉ. धनंजय माने आदी रोटरी सदस्य व ग्राहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
……………………………………