इतर

भारतीय लोकशाही विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे… वाकचौरे

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात शिक्षण दिनानिमित्त व्याख्यान

नाशिक (प्रतिनिधी) –

भविष्यात भारताचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे व स्वतंत्र भारतात लोकशाही रुजली पाहिजे, बळकट झाली पाहिजे या हेतूने भारताचे तत्कालीन प्रथम शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी स्वतंत्र भारतातील शिक्षणपद्धतीची सुरुवात केली, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ श्री. संदीप वाकचौरे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेतर्फे शिक्षणदिन व बालदिनानिमित्त ‘मौलाना आझादांचा शिक्षण विचार आणि भारतीय शिक्षण’ विषयी दुरदृश्य प्रणाली पद्धतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते.
यावेळी बोलतांना श्री. वाकचौरे पुढे म्हणाले की मौलाना अबुल कलाम आझाद हे शिक्षणाचे महत्व जाणणारे द्रष्टे विचारवंत व उदारमतवादी शिक्षणतज्ज्ञ होते. भारतासारख्या विविधतापूर्ण देशात केवळ शिक्षणाने समृद्ध व एकीकृत समाज निर्माण होवू शकतो याची त्यांना जाण होती. शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिपादीत केले होते. त्यास मौलाना अबुल कलाम आझाद यांचा पूर्ण पाठिंबा होता. केवळ साक्षर व्यक्तींनाच मतदानाचा अधिकार असावा अशी मागणी जेव्हा होत होती तेव्हा त्यांनी प्रौढ साक्षरतेची मागणी करतांना लोकशाहीत प्रत्येकालाच मतदानाचा अधिकार असायला हवा अशी भूमिका घेतली. स्वतंत्र भारतात दारिद्र्याचे प्रमाण लक्षणीय होते. अशा परिस्थितीत केवळ शिक्षण व मेहनतीने आर्थिक सुबत्ता येवू शकते असे मत त्यांनी मांडले होते. गुणवत्तापूर्ण शिक्षणातून एक जबाबदार नागरिक घडत असतो. त्यामुळे शिक्षणात आधुनिक शिक्षण, तत्वज्ञान व साहित्य यांचा देखील समावेश असायला हवा अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती. त्यांच्यावर १९ व्या शतकातील भारतातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व समाजसुधारक सर सय्यद अहमद खान यांचा मोठा प्रभाव होता. त्यामुळे सर्व धर्मातील स्त्रियांना देखील पुरुषांच्या बरोबरीने शिक्षण मिळाले पाहिजे असे त्यांचे आग्रही प्रतिपादन असायचे. सर्वांना सक्तीचे व मोफत शिक्षण मिळाले पाहिजे याचा त्यांनी वारंवार पुनरुच्चार केलेला होता.
शिक्षणसंस्थांना आधुनिक साधने पुरविली पाहिजेत, विद्यार्थ्यांना तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षण दिले पाहिजे, भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे कृषीचे शिक्षणही तितक्याच क्षमतेने दिले गेले पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. भारतातील गोरगरीब हे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दिवसभर काबाडकष्ट करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी रात्रशाळा सुरु करण्यात यावी हा विचार देखील मौलाना अबुल कलाम आझाद यांनी मांडला असल्याचे व्याख्याते श्री. वाकचौरे यांनी सांगितले. सध्याच्या काळात उच्चशिक्षित जनता मतदानाविषयी व एकूणच लोकशाही प्रणाली विषयी उदासीन दिसून येत आहे. आजही देशातील लाखो मुले प्राथमिक व माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहत आहेत. शिक्षण हे समृद्ध समाज निर्मिती ऐवजी केवळ पदवी मिळविण्याचे साधन मानले जात आहे, नागरिकांच्या आर्थिक उत्पन्नानुसार शाळांचेही गट तयार झालेले आहेत, परिणामी सामाजात आर्थिक व सामाजिक विषमता वाढीस लागत असल्याची खंत देखील व्याख्याते श्री. वाकचौरे यांनी व्यक्त केली.


आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. डॉ.संजीव सोनवणे म्हणाले की स्वतंत्र भारताचे प्रथम शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान व दिशादर्शन उल्लेखनीय व महत्वपूर्ण होते. त्यातूंच पुढे भारतात आय.आय.टी, एन.सी.ई.आर.टी, यु.जी.सी, विविध विद्यापीठे या सारख्या उच्च शिक्षणसंस्था व शिक्षण केद्रे तयार झाली. भारतीय समाज हा त्यांच्या शिक्षण धोरणाच्या केंद्रास्थानी होता. आताच्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे परीक्षेचे अवास्तव महत्व कमी होईल, प्रत्येक अध्ययन विषयांमध्ये निर्माण झालेल्या मर्यादेच्या भिंती नाहीशा होवून ज्ञानाधिष्ठीत भारतीय समाज व पिढी तयार होवून देश प्रगतीपथावर जाईल असा विश्वास देखील मा. कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी व्यक्त केला. यावेळी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंदाचे प्रमुख डॉ. दयाराम पवार उपस्थित होते.

प्रास्ताविक विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या संचालिका तथा व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ. संजीवनी महाले यांनी केले. या दुरदृश्य प्रणाली व्याख्यान सत्राचे संयोजन, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी केले. सदर दुरदृश्य प्रणाली आयोजित व्याख्यानात विद्यापीठातील विद्याशाखा संचालक, विद्यापीठाचे विविध विभागीय केंद्र संचालक, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी – कर्मचारी, शैक्षणिक संयोजक, शैक्षणिक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button