अकोल्यात माकप दूध, कांदा, सिंचन आदी प्रश्नांसाठी हजारो सह्या जमा करून आंदोलन उभारणार !

अकोले प्रतिनिधी
अकोले विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष गेली चोवीस वर्षे सातत्याने संघर्ष करतो आहे. पक्षाच्या वतीने झालेल्या अनेक आंदोलनांमध्ये श्रमिक-शेतकऱ्यांचे व कर्मचारी-कामगारांचे अनेक प्रश्न सोडवण्यात आले आहेत, मात्र तरीही अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. शेतकरी श्रमिक, कर्मचारी, कामगारांच्या या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पुन्हा एकदा आरपार आंदोलनाची घोषणा केली आहे. आंदोलनाच्या तयारीसाठी आजपासून अकोले विधानसभा मतदारसंघातील सर्व गावांपर्यंत जात, जागृती अभियान सुरू करण्यात आले आहे.
तीन दिवसांचे चार टप्पे असे बारा दिवस चालणाऱ्या या जागृती अभियानांतर्गत दूध, कांदा, सोयाबीन, भाजीपाला, टोमॅटो या शेतीमालाला रास्त भाव मिळावा, वन जमिनी तसेच घरांच्या तळजमिनी श्रमिकांच्या नावे व्हाव्यात, आशा, अंगणवाडी, अर्धवेळ परिचर, ग्रामपंचायत कर्मचारी, बांधकाम कामगार, शालेय पोषण आहार कर्मचारी, आदी ग्रामीण कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य केल्या जाव्यात, अकोले तालुक्याला भंडारदरा व निळवंडे धरणाचे हक्काचे पाणी मिळावे, आढळा बारमाही व्हावी, मुळा धरणाच्या पाण्याचे पुनर्वाटप करून कोतुळ खोऱ्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी व पिण्यासाठी हक्काचे पाणी मिळावे, भंडारदरा धरणात बुडीत बंधारे बांधून आदिवासी शेतकऱ्यांना पाण्याचा हक्क मिळावा, आदिवासी भागात बंधारे बांधून शेतीला हक्काचे पाणी मिळावे, अकोले बरोबरच राजूर येथेही विशेष उपजिल्हा रुग्णालय करावे, तालुक्यात एम.आय.डी.सी. सुरू करावी यासारख्या 12 मागण्या या अभियानात घेण्यात आलेल्या आहेत.
कॉम्रेड सदाशिव साबळे यांच्या नेतृत्वाखाली कॉम्रेड नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, तुळशीराम कातोरे, राजाराम गंभीरे, वसंत वाघ, आदी कार्यकर्ते सजवलेल्या जागृती रथातून गावोगाव जाणार आहेत, पत्रके वाटत जनतेशी संपर्क साधणार आहेत व आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ हजार सह्या गावागावातून गोळा करणार आहेत.
श्रमिक जनतेने या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, हजारो पाठिंबाच्या सह्या द्याव्यात व या पार्श्वभूमीवर उभारण्यात येत असलेल्या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. अजित नवले, ज्ञानेश्वर काकड, प्रकाश साबळे, गणेश ताजणे, संगीता साळवे, हेमलता शेळके आदींनी केले आहे.