जायनावाडी, बिताका येथे शासन आपल्या दारी शिबीर संपन्न.

अकोले/प्रतिनिधी-
ग्रामपंचायत जायनावाडी, बिताका ता. अकोले येथे महाराष्ट्र शासनाकडील शासकीय योजना लोकभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ” शासन आपल्या दारी ” या उपक्रमाची यशस्वीपणे सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी ग्रामसेवक बापू राजळे यांनी माहिती देताना सांगितले कि , सदर अभियानाअंतर्गत नागरिकांना शासकीय योजनांशी निगडित कार्यालयाचे प्रतिनिधी , विविध दस्ताऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील. शासन आपल्या दारी हा उपक्रम संपूर्ण राज्यामध्ये दिनांक 15 एप्रिल 2023 ते 15 जून 2023 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत कार्यालय जायनावाडी बिताका येथे महसूल , ग्रामविकास विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जनतेचे विविध प्रश्न गावातच सुटून त्यांचे समाधान व्हावे,यासाठी शासनाने एक विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये उपस्थित ग्रामस्थांना नमुना नं. ८, घराचे उतारे , जन्म नोंदणी व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र , उत्पन्नाचा दाखला वाटप करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत स्तरावरील विविध योजनांची माहिती देण्यात येऊन पाच टक्के दिव्यांग खर्च करणेबाबत लाभार्थी निवड करण्यात आली. कृषी विभागाकडील योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी ” शासन आपल्या दारी ” या उपक्रमात सहभागी होऊन योजनांचा लाभ घेण्यात यावा , असे आवाहन ग्रामपंचायतीचे सरपंच बाळू मारुती डगळे यांनी केले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बाजीराव रमेश भांगरे , पंढरी पेढेकर , ग्रामसेवक बापू राजळे , कृषी सहायक अरुण बांबेरे , पोलीस पाटील देवराम पेढेकर , अंगणवाडी सेविका अलका बाळू भांगरे , सोमनाथ भांगरे , गोरख भांगरे , विठ्ठल पेढेकर , ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर बाळू मेंगाळ , कर्मचारी निवृत्ति भांगरे यांसह गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.