राजूरची अवैध दारू बंद न झाल्यास आंदोलन !

पोलीस व उत्पादनशुल्क ला इशारा
अकोले प्रतिनिधी
१५ ऑगस्ट च्या आंदोलनात आश्वासन दिल्याप्रमाणे शाहूनगर,कोतुळ, देवठाण,लिंगदेव येथील अवैध दारू कमी झाली आहे त्यामुळे २ ऑक्टोबर चे आंदोलन स्थगित करत आहोत पण राजूरच्या अवैध दारूत काहीच सुधारणा नसल्याने तेथील दारू बंद झाली नाहीतर दिवाळीनंतर राजूर पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दारुबंदी आंदोलनाने पोलीस व उत्पादनशुल्क च्या संयुक्त बैठकीत दिला.
२ ऑक्टोबर च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यात किती कारवाया केल्या याची माहिती देण्यासाठी अकोले पोलीस निरीक्षक, राजूर पोलीस निरीक्षक, उत्पादनशुल्क यांनी दारुबंदी आंदोलनासोबत बैठक आयोजित केली होती.
संगमनेर येथील दारू पुरवत असलेले दुकानाचा परवाना निलंबित केला असून दारू विकणाऱ्या ना लाख रुपयांचा दंड केला आहे. शाहूनगर मध्ये सतत गस्त सुरू असून सतत दारू पकडली जात असल्याचे मिथुन घुगे यांनी सांगितले
त्यावर कार्यकर्त्यानी काहीप्रमाणात समाधान व्यक्त केले पण तरीही निम्रळ, निळवंडे, इंदोरी गाव येथे दारू सुरू असून राजूरमध्ये खुलेआम दारू सुरू आहे.त्याचप्रमाणे राजूर परिसरात खडकी, पाडाळणे,शिसवद,रंधा,आंबित, वाकी बंगला या गावात दारू विक्री सुरू असून तेथील विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. शेंडी भांडरदरा येथील दुकानातून राजूरमध्ये दारू येत असल्याने या दुकानांचे परवाने निलंबित करण्याची मागणी करण्यात आली व राजूरमधील विक्रेते तडीपार करण्याची मागणी केली.
प्रत्येक गावातील कार्यकर्त्यानी त्या त्या गावातील दारूची स्थिती मांडली.मात्र राजूर येथील दारूविक्री पूर्णतः बंद न झाल्यास व तेथे दारू देणाऱ्या शेंडी च्या दुकानावर कारवाई न झाल्यास दिवाळीनंतर आंदोलन करण्यात येईल असे ऍड वसंत मनकर यांनी सांगितले. हेरंब कुलकर्णी यांनी सर्व अवैध धंदे करणारे विक्रेते याना गांधीजयंती सप्ताहात एकत्र करून त्यांनी पर्यायी व्यवसाय करावेत व या गरीबांचे संसार धुळीस मिळणारी दारूविक्री करू नये असे प्रबोधन करावे अशी सूचना केली. मच्छीन्द्र देशमुख यांनी उत्पादन शुल्क खात्याच्या वागण्याने अवैध दारू वाढत असल्याचे निदर्शनास आणले तर इंदोरी गावात दारू वाढत असल्याचे व सिन्नर मार्गे दारू वाढत असल्याचे कार्यकर्त्यानी सांगितले. पंटर केसेस न करता राजूरमध्ये मालकांवर गुन्हे दाखल करावे अशीही सूचना करण्यात आली
यावर राजूर पोलीस निरीक्षक साबळे व उत्पादनशुल्क अधिकारी चांदेकर यांनी राजूर ची अवैध दारू पूर्णतः बंद होईल व शेंडी ची परवाना दुकाने जर त्यात आढळली तर ती सील केली जातील असे सांगितले. संतोष मुतडक यांनी राजूरमध्ये तातडीने ग्रामरक्षक दल स्थापन करावे अशी सुचना केली. त्याची लगेच अंमलबजावणी करण्याचे श्री साबळे यांनी सांगितले.
या बैठकीत शांताराम गजे, हेरंबकुलकर्णी, ऍड वसंत मनकर,प्रमोद मंडलिक,संतोष मुतडक,बाळासाहेब कानवडे, मच्छीन्द्र देशमुख,बाळासाहेब मालूजकर, संगीता साळवे,जालिंदर बोडके, सुभान शेख,मिलिंद रुपवते,कैलास आरोटे,प्रतिमा कुलकर्णी उपस्थित होते..
एक महिन्यात अकोले तालुक्यातील अवैध दारू न थांवल्यास दिवाळीनंतर व्यापक आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेवटी सर्व कार्यकर्त्यानी दिला.