धुमाकूळ घालणारा बिबट्या झरेकाठीत जेरबंद!

संगमनेर / प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील झरेकाठी आणि परिसरात धुमाकूळ घालून दहशत निर्माण करणारा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात काल पहाटे अलगत अडकला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी काही प्रमाणात सुटकेचा निस्वास सोडला असून अजूनही काही बिबटे या परिसरात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले असून या बिबट्यांचाही वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. झरेकाठी येथील सोमनाथ भागवत डोळे यांच्या वस्तीजवळ असणाऱ्या गट नंबर १९ मध्ये असणाऱ्या गिन्नी गवताच्या शेतात वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता मात्र बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्याला हुलकावणी देत होता काल पहाटे अखेर हा बिबट्या पिंजऱ्यात जेर बंद झाला. गेल्या अनेक दिवसापासून डोळे वस्तीवर बिबट्याची दहशत निर्माण झाली होती. याबाबत संगमनेरच्या वन विभागाकडे सोमनाथ डोळे यांनी तक्रार केली होती त्यानुसार संगमनेरच्या वनविभागाने या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावला लावला होता अखेर काल रविवारी पहाटे चार वाजता बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. या परिसरात अजूनही बिबट्या आणि तिची पिल्ले आहेत या बिबट्यांचाही तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सोमनाथ डोळे यांनी केली आहे.