दरोडीचा तरुण मुंबई पालिकेतील शिक्षण विभागात उच्च पदावर!

[ व्यक्ती विशेष ]
दत्ता ठुबे –
घरची अत्यंत हालाखीची परिस्थिती , घरात शिक्षणाचे नामोनिशाण नाही , आई, वडील मोलमजुरी करून कुटूंबांचे गुजराण करत , परंतु जिद्दीने पेटून उठलेला एक तरुण , देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पोटापाण्या साठी जातो काय , अन् तुटपुंजी नोकरी करून शिक्षण घेत मुंबई महानगर पालिकेतील शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून रूजू होतो , काय .
ही कहाणी आहे , पारनेर तालुक्यातील अतिशय छोटे व डोंगराळ गाव असलेले दरोडी येथील किसन बाजीराव पावडे पाटील यांची . त्यांचे मुळ गाव दरोडी , त्यांचे शिक्षण ही एम . ए . [ इंग्रजी ] बी ए बी एड ,एम एड .दरोडीसारख्या अतिशय दुर्गम आणि दुष्काळी भागात जन्म झाला. वडील साधारणपणे ३० वर्षापुर्वी मजुरी आणि सालगडी म्हणून काम करत होते. आई देखील रोजंदारीवर काम करून चार पोरांसह संसाराचा गाडा हाकायला मदत करत असे. किसन ने देखील इयत्ता ९ वी पासुन मोल मजूरी ची कामे करायला सुरुवात केली . मग ती रोजगार हमीची कामे, विहीर खोदण्याची कामे, डोंगरात पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेंतर्गत खड्डे खोदण्याचे काम, कांद्याच्या गोण्यांची हमाली अशी अनेक कामे करून शिक्षण पुर्ण केले. शिक्षणाची सुरुवात दरोडी येथील इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत , माध्यमिक शिक्षण दरोडी मधील हनुमान विद्यालयात इयत्ता ८ वी ते १० वी हनुमान विद्यालयात, पुढे अळकुटी मध्ये उच्च माध्यमिक शिक्षण येथील श्री. साईनाथ माध्यमिक विद्यालय , पुढे उच्च शिक्षणासाठी तालुक्याचे गाव असलेले पारनेर येथील पदवीपर्यंत पारनेर महाविद्यालयात पूर्ण केले, त्यानंतर अहिल्यानगर मध्ये उच्च महाविद्यालयात एम ए इंग्रजी पूर्ण केले . त्यानंतर संगमनेर मध्ये शिक्षण शास्त्र महाविद्यालय या ठिकाणी बी एड ची पदवी पूर्ण केली .
सन २००१ साली नोकरी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई नगरी मध्ये पदार्पण केले. सुरुवातीला साडेचार वर्षे विक्रोळी च्या पार्क साईट येथील विवेक विद्यालय येथे विनाअनुदानित शाळेवर काम केले . सदर शाळेत काम करत असतानाच खाजगी शिकवणी वर्गा मध्ये इयत्ता दहावी व बारावीला इंग्रजी विषयाचे अध्यापन केले. त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेत २००६ साली इंग्रजी विषयाचा शिक्षक म्हणून नेमणूक झाली. अडीच वर्षे महानगरपालिकेमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून काम केले . सन २००८ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात शिक्षण निरीक्षक या पदाची जाहिरात आल्यानंतर स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून वॉक इन सिलेक्शन मध्ये मार्च २००९ मध्ये शिक्षण निरीक्षक या पदावर नेमणूक झाली. सुरुवातीला विभाग स्तरावर काम करून मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी तथा शिक्षण उपसंचालक यांचे सोबत सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तेव्हापासूनच वक्तृत्व कलेची आवड असल्यामुळे विविध कार्यक्रमांमध्ये निवेदक म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली. मुंबईसारख्या ग्लॅमर व झगमगटी असलेल्या मायावी शहरांमध्ये मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री व विविध कॅबिनेट मंत्री यांच्या वेग वेगळ्या सभां व कार्यक्रमांमध्ये निवेदक म्हणून काम करण्याची नाविन्य व वैविध्य पुर्ण संधी मिळाली. तसेच मुंबई महापालिकेचे महापौरांच्या विविध कार्यक्रमांमध्ये निवेदक म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली . यासोबतच वारकरी संप्रदायाची परंपरा असल्यामुळे विविध ठिकाणी प्रबोधन , प्रवचन व हरि किर्तन करण्याचा देखील योग आला. या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून दररोज एक अभंग लिहिण्यास सुरुवात केली. आता पर्यंत अनेक अभंग लिहून सोशल मीडिया च्या माध्यमातून प्रसिद्ध ही झाले आहेत . लवकरच या सर्व अभंगाची एक अभंगवाणी पुस्तिका प्रसिद्ध होणार आहे . २०२१ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी या पदावर पदोन्नती मिळाली . या माध्यमा तून प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही विभागांचा कारभार करण्याची संधी प्राप्त झाली आहे . अतिशय कठीण परिस्थितीतू शिक्षण घेऊन उच्च पदापर्यंत मजल मारता आली.
आजचा तरुण पुस्तकी अभ्यास करण्या ऐवजी मोबाईल व टि व्ही त गुंतत चालला आहे , हे जीवन व जीवनात काही तरी करून दाखविण्या ची संधी जी मिळाली आहे , तिचे सोनं करा , अन्यथा वेळ निघून गेल्यावर फक्त पश्चात्ताप करण्याची वेळ येते . अभी नहीं तो , कभी नहीं I