इतरक्राईम

इंदोरी फाटा बनले अवैध दारू विक्रीचे केंद्र !

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तोंडावर बोट,कारवाई मात्र शून्य

अकोले प्रतिनिधी 

अकोले तालुक्याच्या प्रवरा,मुळा,आढळा व आदिवासी भाग या चारही विभागात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे.या अवैध दारू विक्रीचे केंद्र अकोले तालुक्यातील इंदोरी फाटा हे बनले आहे.राज्य उत्पादन शुल्क व स्थानिक पोलिसांच्या मेहेरबानीमुळे आदिवासी अकोले तालुक्यात अवैध दारू उत्पादकांचे चांगलेच फावले आहे.अधिकाऱ्यांना चिरीमिरी दिल्यामुळे ते काहीच कारवाई करत नसल्यानेअवैध दारू विक्रेते हे सुसाट सुटले आहे.         

      अकोले तालुक्याची ओळख ही डाव्या चळवळीचा तालुका व थोर क्रांतिकारकांचा तालुका म्हणून आहे.मात्र गेल्या काही दिवसांपासून अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची विक्री सुरू आहे. अकोले शहरातील शाहूनगर परिसरात बनावट दारूमुळे अनेक जण आपल्या प्राणाला मुकले आहेत. या अनुषंगाने 15 ऑगस्ट रोजी दारूबंदी चळवळीचे प्रणेते हेरंब कुलकर्णी यांनी धरणे आंदोलन केले. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही काळ दारू बंद केली.मात्र पुन्हा याच ठिकाणी राजरोसपणे दारू विक्री सुरू झाली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व स्थानिक पोलीस यंत्रणा नागरिकांचा रोष शांत होईपर्यंत कारवाई करतात. त्यानंतर प्रकरण थंड झाले की अधिकाऱ्यांची कारवाई देखील थंड होते

.सध्या कोल्हार घोटी राज्य मार्गावरील इंदोरी फाटा हे अवैध दारू विक्रीचे प्रमुख केंद्र बनले आहे. या ठिकाणाहून रात्री अपरात्री अनेक चार चाकी गाड्यांमधून अकोले तालुक्याच्या चारही विभागात दारू पोहोचवण्याची व्यवस्था केली जात आहे. संगमनेर शहरातून अकोल्यातील  इंदोरी फाटा येथे खुशकीच्या मार्गाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर देशी दारू आणली जाते.त्यानंतर अगदी व्यवस्थितपणे ही दारू खाली असलेल्या एजंटांमार्फत गावोगावी पोहोचते.इंदोरी फाटा येथे सकाळी सहा वाजेपासून ते रात्री दोन वाजेपर्यंत तुम्ही कधीही जा तुम्हाला त्या ठिकाणी दारू अवश्य मिळणारच.त्यामुळे या परिसरात तळीराम भर सकाळी अन रात्री अपरात्री केव्हाही गरबा खेळताना दिसून येतात. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व स्थानिक पोलीस यंत्रणा या अवैध दारू विक्रेत्याला पाठीशी घालत असल्यामुळे त्याच्यावर पाहिजे तेवढ्या कारवाया झालेल्या नाहीत. त्यामुळे माझं कोणी काहीच बिघडवू शकत नाही, असा गोड समज झाल्याने संबंधित  दारू विक्रेता मोठ्या शिताफिने दारूचा धंदा करीत आहे.यापूर्वी दारूबंदी असलेल्या राजुर गावातून मोठ्या प्रमाणावर इतरत्र दारूचा साठा पुरवला जात होता.मात्र गेल्या काही महिन्यांपासून राजुरची ओळख कमी झाली असून त्या जागी इंदोरी फाटा हे नाव पुढे आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलिसांनी या अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. अन्यथा इंदोरी फाटा येथे भविष्यात शाहूनगर सारखे आंदोलन उभे राहील यात तिळमात्र ही शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button