केंद्राने 100 लाख टन साखर निर्यात करण्यासाठी कारखान्यांना परवानगी द्यावी माजी मंत्री शंकरराव गडाख

नेवासा प्रतिनिधी
देशात चालू वर्षीच्या गळीत हंगामात जवळपास 360 लाख टन तर एकट्या महाराष्ट्रात 140 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. नविन हंगाम सुरु होतांना देशात 60 लाख टन व महाराष्ट्रात 30 लाख टन साखर शिल्लक राहणार असून नवीन हंगामातील महाराष्ट्रातले उत्पादन 140 लाख टन होण्याची शक्यता आहे. म्हणून कारखान्यांचे शिल्लक साठे कमी करून आर्थिक तरलता येण्यासाठी आणि स्थानिक बाजारात साखरेचे दर वाढण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने चालू वर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच निर्यात खुली करण्याचा निर्णय घ्यावा व किमान 100 लाख टन साखर निर्यात करण्यासाठी कारखान्यांना परवानगी द्यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी केली.
मुळा कारखान्याच्या 45 व्या गळीत हंगामा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठावर नुकतेच नियुक्त झालेले कुलगुरू डॉ. शरदराव गडाख हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते. आ.गडाख व कुलगुरू गडाख यांच्या शुभहस्ते विधीवत पूजा केलेली ऊसाची मोळी गव्हाणीत वाढवण्याचा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी झालेल्या सभेत मुळा कारखान्याच्या सभासद, ऊस उत्पादक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने कुलगुरू डॉ.गडाख यांचा आमदार शंकरराव गडाख यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू गडाख यांच्या कार्यपद्धतीचा गौरवपूर्ण उल्लेख करत स्वतःच्या कष्ट आणि कर्तुत्वामुळेच त्यांना कुलगुरू पद मिळाले आहे. मात्र कुलगुरू झाले तरी या परिसराशी नाते कायम राहील अशी अपेक्षाही आमदार गडाख यांनी व्यक्त केली.
मुळा कारखान्याच्या सभासदांनी केलेला सत्कार हा घरचा सत्कार आहे. कारण मीही सभासद आहे. हा सत्कार म्हणजे मला मिळालेली ऊर्जा असून ती मला भावी आयुष्यात उपयोगी पडणार आहे. तुम्ही दिलेले प्रेम आणि ऊर्जेच्या बळावरच कुलगुरू पदाचे मिळालेल्या संधीचे मी सोने करण्याचा प्रयत्न करील असे उद्गार कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी काढले. आमदार गडाख यांचे सक्षम नेतृत्वाखाली मुळा उद्योग समूहातील प्रकल्प व संस्थांच्या झालेल्या विकासाबद्दल त्यांनी प्रशंसा केली