इतर

नवरात्री उत्सव। (घटस्थापना )

.

नमस्तेsस्तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते । शंखचक्रगदाहसत्ये महालक्ष्मी नमोस्तुते ।।१।।…….

अनादीकाळापासून भारतीय हिंदू परंपरेत वैदिक , अध्यात्मिक , वैज्ञानिक संस्कृतीप्रधान , संस्कारी व्रतवैकल्ये , प्रथा , सणउत्सव अत्यन्त श्रद्धेने , उत्साहाने साजरी करण्याची परंपरा आहे.

हिंदुधर्मामध्ये भारतातील प्रत्येक प्रांतामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये म्हणजे अगदी बारा महिने असे उत्सव साजरे केले जातात. ही उत्सव परंपरा चैत्र महिन्यापासून अगदी फाल्गुन महिन्यापर्यंत अनेक पारंपरिक सण उत्सव साजरी करण्याची प्रथा आहे.
त्या प्रत्येक सणाला मानवी संस्कृतीच्या नैतिक जीवनमूल्यांची अर्थपुर्ण अशी अध्यात्मिक , वैचारिक , कल्याणकारी अभ्यासात्मक बैठक आहे. प्रत्येक सणाचे एक वैशिष्टय आहे. हे सर्वश्रुत आहे.


मी या बाबत माझ्या भारतीय सण आणि उत्सव या विषयावर प्रत्येक सणाबद्दल सारांशात्मक वैयक्तिक विचार मांडले आहेत.आज गणेशोत्सवानंतर अत्यन्त उत्साहाने साजरा होणाऱ्या नवरात्री म्हणजे ( घटस्थापना ) या महालक्ष्मीच्या उत्सवाबद्दल लिहीत आहे.


अश्विन शुद्ध प्रतिपदेला या नवरात्री उत्सवाचा प्रारंभ होतो म्हणजेच त्या दिवशी घटस्थापना केली जाते. याला शारदीय नवरात्री असेही म्हटले जाते. आणि भारतीय हिंदू परंपरेतील हा नऊ दिवस अत्यन्त उत्साहाने आणी श्रद्धेने साजरा केला जाणारा महालक्ष्मीचा शरद ऋतूच्या प्रारंभीच येणारा उत्सव आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी पर्यंत महालक्ष्मीची प्रथेनुसार विधिवत घटामध्ये ( कलशामध्ये ) नारळ , ठेवून हारफुले ( झेंडूची माळ ) घालून अखंड दीपलावून अत्यन्त श्रद्धेने उपवास करून या महालक्ष्मी आदिमायेची पूजा केली जाते. यालाच घटस्थापना म्हटले जाते.
घट म्हणजे कलश पारंपारिक धार्मिक मान्यतेनूसार कलश म्हणजे हे देवदेवतांचे , दैवी शक्तींचे , ग्रहगोल , तारे , नक्षत्रे यांचे पवित्र निवासस्थान आहे असे मानले जाते. तसेच हा मंगल घटकलश म्हणजे अत्यन्त मंगलमय , सुखकारक , शुभंकर अशा सुखद वैभवी सुखसमृद्धीचे , सुखरूपतेचे प्रतीक मानले जाते. या उत्सवात दैवी शक्तींना केलेल्या आवाहनाने त्यांच्या आराधनेने घरातील दैन्य , अरिष्ट , नकारात्मक उर्जा नष्ट होऊन सुखऐश्वर्य , समाधान , आरोग्य आयुष्य यांची प्राप्ती होते. अशी प्रत्येकाची श्रद्धा असते.
श्रद्धापूर्वक शुचिर्भूत होवून
🕉️ अपवित्र: पवित्रोवा सर्वावस्था गतोsपिवा। य: स्मरेतपुंडरीकाक्ष स बाह्याभ्यंतर: शुचि: ‘,।।
असा मंत्र म्हणून पूजविधिस सुरुवात करण्याची ऐच्छिक संकल्प सोडण्याची प्रथा आहे.
प्रत्येक घरामध्ये आपल्या पाररांपरिक चालत आलेल्या प्रथेप्रमाणे ही नवरात्रीची पूजा केली जाते. देवघरातील देवपूजा करून कुलाचारा प्रमाणे देवाचे टाक विड्याच्या पानावर बसवून कलशामध्ये गंगेचे पाणी , अक्षदा , व पानावर नारळ ठेवून त्या कलशाची 9 दिवस विधिवत कार्हळ्याच्या किंवा झेंडूच्या फुलांची माळ रोज लावून , रोज समई ( दिवा ) लावून..
गंगे ! च यमुने ! चैव गोदावरी ! सरस्वती ! नर्मदे ! सिंधू ! कावेरी ! जलेs स्मिन सन्निधिं कुरु ।। या मंत्रोच्याराने साग्रसंगीत पूजा केली जाते. तसेच या पूजाविधित धान्यपेरणी देखील करण्याची प्रथा आहे.

घटकलश बसवल्यावर त्यासोबत एका ताम्हणात किंवा परातीत शेतातील चांगली माती घेऊन ती ओली करून त्यात धान्य ,बियाणे पेरले जाते त्याला नऊ दिवस पाणी घातले जाते त्यावेळी नऊ दिवसात त्या धान्याला कोंब फुटलेले असतात म्हणजेच त्या बिया रुजल्या जातात. हा सुबत्तेचा शुभसंकेत मानला जातो.

घटस्थापना हा सण सुगीच्याच दिवसात येत असल्यामुळे कृषी विषयक आधारीत अशी वैज्ञानिक बी , बियाणे , माती ,पाणी , हवामान या शास्त्रीय चिकित्सा आहे असेही समजले जाते.
नवरात्रातील या नऊ दिवसांच्या उत्सवात या महालक्ष्मी देवीची सर्वजण उत्साहाने पूजा करतात. पौराणिक कथा मध्ये महिषासुर राक्षसाने पृथ्वीवर अराजकता माजविली होती म्हणून या देवीने , महालक्ष्मीने अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दशमी पर्यंत त्याच्याशी नऊ दिवस युद्ध करून त्या महिषासुर राक्षसाचा वध केला म्हणून तिला नवदुर्गा / महिषासुरमर्दिनी असेही म्हटले जाते. म्हणून आजकाल सिंहावर आरूढ झालेली हातात त्रिशुळ असलेली महिषासुराचा वध करीत आहे अशी महालक्ष्मीची मूर्ती अनेक ठिकाणी उत्सवात पाहण्यास मिळते.


आता गणेशोत्सवा प्रमाणेच सार्वजनिक ,सांस्कृतिक मंडळे महालक्ष्मीच्या मोठया मूर्ती आपल्या मंडळात बसवून भजन , कीर्तन , प्रवचन , देवीचे पाठ , स्तोत्रपठण करून हा नवरात्रीचा उत्सव साजरा करीत आहेत हे आपण पाहतोच.
सामाजीकतेचे नैतिक , भक्तीपूर्ण भाव मनात ठेवून सर्वांनी एकत्र यावे हाच या उत्सवाचा उद्देश आहे याची जाणीव मात्र प्रत्येकाला असणे अनिवार्य आहे. या नवरात्री उत्सवात सर्वजण आनंदाने एकत्र येवून आरत्या , भजने , गरबा , दांडिया खेळताना दिसतात. अनेक धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन , आयोजन केले जाते.
*चैत्रशुद्ध नवमीला (खंडेनवमी ) म्हणजे नवव्या दिवशी या नवरात्र उत्सवाची आपापल्या प्रथेप्रमाणे सांगता होते.
*आणी आनंदाने दुसरे दिवशी सीमोल्लंघन करून दशमीला म्हणजे विजया दशमीला आपट्याच्या झाडांची पाने सोने समजून वाटण्याची ही परंपरा आजही सुरू आहे.*
हा विजयोत्सव भारतात उत्तरप्रदेश , कलकत्ता , गुजरात , आसाम ,महाराष्ट्र , बिहार एवढेच नाही तर पाश्च्यात्य देशात जिथे भारतीय हिंदू आहेत अशा ठिकाणी देखील हे असे धार्मिक उत्सव साजरे केले जात आहेत….

वि.ग.सातपुते.
संस्थापक अध्यक्ष:-
महाकवी कालिदास प्रतिष्ठान
पुणे,मुंबई, ठाणे, मराठवाडा (महाराष्ट्र)
📞(9766544908)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button